ताब्यात घेतलेल्या तिघा संशयिताकडून कसून चौकशी
प्रतिनिधी /फोंडा
सांतिईस्तेव्ह-माशेल पुलाखाली एका इसमाचा निघृणरित्या खून केल्याचा प्रकार काल रविवारी दुपारी 11 वा. सुमारास उघडकीस आला. हरींदर प्रसाद (44, रा. अमेयवाडा माशेल, मूळ बिहार) असे त्याची ओळख पटली आहे. बेतकी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्यावर व शरीरावर जखमा आढळल्याने सदर संशयास्पद खूनाचा प्रकार असल्याची नोंद फोंडा पोलिसांनी केली असून याप्रकरणी पेमीयुगलासह एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांतिइस्तेव्ह येथे सदर इसमाचे शनिवारी उशिरा रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर त्याला अत्यवस्थ अवस्थेत जुवे येथील पुलाखाली फेकून देण्यात आले होते. रविवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या नजरेस पडल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. यावेळी हरिंदर प्रसाद याची हलकीशी हालचाल होत होती. 108 रूग्णवाहिकेत हलविण्यात येत असेपर्यत त्याच्या अंगात जीव होता. बेतकी येथील आरोग्य केंद्रात पोचेपर्यंत रूग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला, बेतकी येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयत इसमाच्या डोक्यावर व शरिराच्या इतर भागावर जखमा आढळलेल्या असून सदर प्रकार निघृण खूनाचा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञाताविरोधात भां.द.सं. 302 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान दक्षिण गोवा अधिक्षक पंकजकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक मोहन गावडे पुढील तपास करीत आहे.
दोघा बहिणी व प्रियकराने काटा काढल्याचा संशय
मयत हरिंदर प्रसाद हा बांबोळी येथील आयपीएचपी मनोरूग्णाच्या इस्पितळात सुरक्षारक्षक म्हणून काही महिन्यापुर्वी कामाला होता. त्यानंतर तो टाईल्स फिटर म्हणून काम करीत होता. सांतिइस्तेव्ह येथील एका युवतीला तो त्रास देत होता. त्यानुसार मयत हरिंदर याचा काटा काढण्य़ाच्याहेतूने युवतीच्या प्रियकराने व तिच्या बहिणीने कट कारस्थान रचल्याचा संशय फोंडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिघाजणांनी त्याला बेदम माराहण केल्यानंतर पुलाजवळ आणून ठेवल्याचा संशय असून अत्यवस्थ अवस्थेत तो विव्हळत असताना पाण्यात पडल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. बेतकी येथील आरोग्य केंद्रात पोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फोंडा पोलीस ताब्यात घेतलेल्या तिघा संशयिताकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.