वार्ताहर/ सांबरा
सांबरा येथील ग्रा. पं. सदस्य प्रशांत इराप्पा गिरमल व संतोष आण्णाप्पा देसाई यांनी गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गावातील रुग्णांना दवाखान्याला वेळेत पोहोचविल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून कोरोना रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून ग्रा. पं. सदस्य प्रशांत इराप्पा गिरमल व संतोष आण्णाप्पा देसाई या दोघांनी गावच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
निलजी मठाचे स्वामीजी व मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी जि. पं. माजी सदस्य नागेश देसाई प्रास्ताविक करताना म्हणाले की, गावाला सध्या रुग्णवाहिकेची अत्यंत गरज आहे. या दोन ग्रा. पं. सदस्यांनी रुग्णवाहिका देऊन गावच्या लोकांसाठी फार मोठी मदत केली आहे. सर्व ग्रा. पं. सदस्य कोरोना रोगाबाबत गावात जागृती करत आहेत. त्यांना सर्व गावकऱयांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी अंगणवाडी शिक्षिका व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.