प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा येथील बेसिक ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट एअरफोर्स स्टेशन येथे शनिवारी प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा पार पडला. 3 हजार 325 प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. हे प्रशिक्षणार्थी आता एअरफोर्समध्ये विविध ट्रेडमध्ये सेवा बजावणार आहेत. सांबरा एअरमन ट्रेनिंग सेंटरचे एअर कमोडोर रविशंकर यांची या शपथविधी सोहळ्याला विशेष उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कमोडोर रविशंकर म्हणाले, एअरफोर्सने आजवर देशसेवेची परंपरा अविरतपणे सांभाळली आहे. ज्या ज्या वेळी देशावर संकट आले, त्या त्या वेळी एअरमननी आपली चुणूक दाखविली आहे. यापुढेही प्रत्येक संकटात एअरमन पुढे असेल्। असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी डोळय़ांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. त्यांनी सादर केलेले पथसंचलन नेत्रदीपक ठरले. कमोडोर रविशंकर यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी प्रशिक्षणार्थी विकास कुमार, हिमांशु चौधरी, शिवम सिंघल, अंकित कुमार यांना गौरविण्यात आले.