वार्ताहर/ राजापूर
सांबराची शिंगे विक्रीसाठी नेणाऱया सिंधुदुर्ग-रेडी येथील दोघांना राजापूर तालुक्यातील उन्हाळे गाडगीळवाडी येथे अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली. यात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील दोन सांबर शिंगासह सुमारे 1 लाख 19 हजार 530 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवार 16 जुलै रोजी दुपारी 1.40 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अनंत त्रिंबक राणे (56) व संभाजी अशोक पिंगुळकर (49) (दोघेही रेडी, ता. वेंगुर्ले) अशी या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी राजापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. राजापूर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ले येथून दोघे इसम सांबर शिंगाची विक्री करण्यासाठी राजापुरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शाह यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, बाळू पालकर, पोलीस नाईक सासवे, सत्यजित दरेकर, शांताराम झोरे यांनी ही सापळा रचून कारवाई केली.
यातील संशयित आरोपी अनंत राणे व संभाजी पिंगुळकर हे मारूती सुझुकी गाडीने सिंधुदुर्गातून राजापूरकडे येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर कोंढेतड गाडगीळवाडी येथे पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. त्यात गाडीमध्ये सांबरशिंग आढळून आली. या सांबर शिंगांची राजापूर वनपाल सदानंद घाटगे यांच्यामार्फत खातरजमा करण्यात आली. या कारवाईत आरोपींकडील सांबरांची 2 भरीव शिंगे आढळली आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना स्वतःच्या फायद्यासाठी व्यापार विक्री करण्याच्या उद्देशाने वन्य प्राण्यांची शिंगे बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी संशयित आरोपींकडून सांबर शिंगासह, कार, दोन मोबाईल व रोख रूपये 1 हजार 530 असा असा सुमारे 1 लाख 19 हजार 530 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधि. 1972 चे कलम 39, 44, 48, 51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करीत आहेत.