ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. सीमेवर घुसखोरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानने आता गेल्या काही महिन्यांत ड्रोन कारवाया वाढवल्या आहेत. रविवारी रात्री उशिरा जम्मूमधील सांबा येथे लष्कराच्या छावणीजवळ पुन्हा चार ठिकाणी संशयित ड्रोनचा वावर आढळून आला. सांबाचे एसएसपी राजेश शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
रविवारी रात्री उशिरा सांबाच्या बारी ब्रह्मना भागातील लष्कराच्या छावणीजवळ चार ठिकाणी संशयित ड्रोन दिसले. सांबामध्ये ड्रोन दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शनिवारीही सांबामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी संशयित ड्रोन दिसले होते. त्यामुळे सीमाभागात सध्या सुरक्षा दल सतर्क आहेत.