ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन घुसखोरांना ठार केलं. या घुसखोरांच्या ताब्यातील 36 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
बीएसएफचे डीआयजी एसपी एस संधू म्हणाले, जवानांच्या नजरेतून सुटून सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर तीन घुसखोर आले होते. बीएसएफ जवानांनी या घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण घुसखोर न थांबता तसेच पुढे निघून जात होते. त्यावेळी जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात तिन्ही घुसखोर ठार झाले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 36 किलो हेरॉईन आढळून आले. हे हेरॉईन जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे संधू यांनी सांगितले.