मडगावातील मिरवणुकीत विविध गटांतील आकर्षक चित्ररथांनी फेडले डोळय़ांचे पारणे, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /मडगाव
मडगावात रविवारी किंग मोमोने आपली राजवट जाहीर केल्यानंतर सांस्कृतिक नगरी कार्निव्हलमय झाली. फन अँड जंक, फॅमिली, क्लब आणि संस्था, क्लाऊन अँड जोकर अशा विविध गटांतील चित्ररथांनी उपस्थितांच्या डोळय़ांचे पारणे फेडले. कोविड महामारीच्या दरम्यान आघाडीवर राहून आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिकासारख्या कर्मचाऱयांनी केलेल्या सेवेला समर्पित चित्ररथाला प्रेक्षकांनी टाळय़ा वाजवून चांगला प्रतिसाद दिला.
याखेरीज गोव्यातील लाकडाचा उपयोग या शीर्षकाखालील सुतारकाम करणाऱयांच्या जीवनावर आधारित चित्ररथ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. वृक्षतोड थांबवा, पृथ्वी सांभाळा असा संदेश देणारा चित्ररथही मिरवणुकीत सामील झाला होता. गोव्यात काजूचा व्यवसाय करणारे शेतकरी आणि काजूची लागवड ते काजुवर प्रक्रिया करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यापर्यंतची प्रक्रिया याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
विविध पथकांचे आकर्षण
युक्रेन आणि रशिया युद्धाच्या अनुषंगाने युपेन आणि रशियाचे झेंडे घेऊन प्रेम करा, युद्ध नको असा संदेश देणारे जोडपे असलेले वाहन, गोव्याच्या सुक्या मासळीवरील तसेच बेडकांच्या जतनाचा संदेश देणारा चित्ररथ, भारतीय सेनेवरील चित्ररथ, लाकडापासून साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱया अवजारांचे प्रदर्शन, मायकल जॅक्सनची वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झालेली एक व्यक्ती, मडगाव पालिका कर्मचाऱयांचे पथक, पारंपरिक लोकनृत्ये सादर करणारी पथके, रेडा व चिंपाझी यांची प्रतिकृती यांनीही लक्ष वेधले.
सायंकाळी 4 च्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. गोव्याचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले माजी फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बावटा दाखवून चित्ररथ मिरवणुकीस प्रारभ करण्यात आला. तीन दिवस आपली राजवट असून खा, प्या व मजा करा असा संदेश किंग मोमो यांनी यावेळी दिला. यावेळी कार्निव्हल समितीचे अध्यक्ष व मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस, नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, नगरसेवक व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कटियाल या उपस्थित होत्या. लोकांनी कोलवा जंक्शन ते फातोर्डातील बोरकर सुपर स्टोअरच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून या चित्ररथ मिरवणुकीचा आनंद घेतला. यात देशी-विदेशी पर्यटकांचा समावेश होता.
या मिरवणुकीने मडगाव कार्निव्हल समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची समाप्ती झालेली आहे. समितीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्निव्हल कार्यक्रमांना शुक्रवारी सायंकाळी विविध पथकांनी सादर केलेल्या इंत्रुज लोककलांनी प्रारंभ झाला होता. यंदा प्रथमच पारंपरिक पद्धतीने कार्निव्हल साजरा करण्यावर भर दिल्याने जुन्या इंत्रुजची झलक उपस्थितांना पाहायला मिळाली होती. शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी मडगाव पालिका चौकात कार्यक्रम रंगले होते.