प्रतिनिधी/ कारवार
कोविड महामारीमुळे कारवार तालुक्यात गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून ठप्प झालेले नाटक, यक्षगानसह वेगवेगळे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची मुभा उपलब्ध करून देण्याची मागणी कारवार तालुका रंगभूमी कलाकार मंचने कारवार जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के. यांच्याकडे केली.
जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात मंचच्या पदाधिकाऱयांनी आणि सदस्यांनी असे म्हटले आहे की. कारवार तालुका कलाकारांची खाण म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या निमित्ताने नाटक, यक्षगानसह अन्य अनेक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तथापि कोविड महामारीमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून येथे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ठप्प झाले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमावर केवळ कलाकारांचे नव्हे तर सांगीत संयोजक वेशभूषांचा पुरवठा करणारे साऊंड सिस्टीम मालक, नाटय़मंच, आसन व्यवस्था करणारे असे अनेक लोक नाटक, यक्षगान आदी कार्यक्रम ठप्प झाल्याने अडचणीत आले आहेत. कारवार तालुक्यात यापूर्वीच यात्रांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. रात्र जागरणीसाठी आणि कलाकारांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव करून देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोविड नियमांचे पालन करून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ववत करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि म्हणून जिल्हा प्रशासनाने आम्हाला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रितसर परवानगी देऊन कलाकारांची मदत करावी, अशी मागणी पुढे निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन स्वीकारून बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोविड महामारीमुळे कलाकारांच्यावर ओढवलेल्या समस्यांची जाणीव जिल्हा प्रशासनाला आहे. नाटक, यक्षगान आदी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अफीडवीएटची आवश्यकता नाही. साऊंड सिस्टीमबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. कोविड नियमांचे पालन करून आयोजकांनी कार्यक्रम संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. खबरदारीचे क्रम हाती घेऊन कार्यक्रमांचे आयोजन केल्यास जिल्हा प्रशासनाची काही एक तक्रार नाही. असे पुढे हरीशकुमार यांनी स्पष्ट केले.
यावेळी नागेंद्र आंचेकर, रमेश गुणगी, उदय नाईक, प्रकाश नाईक, मारुती बाडकर, दीपक परवार, गोपाल गौडा, सुभाष नाईक, सुरेश नाईक, हेमंत गौडा, जनार्धन नाईक, जगदीश पेडणेकर, व्ही. आर. राणे, उल्हास नाईक, गोविंद गौडा, जी. एस. नाईक, आदी अलाकार उपस्थित होते.