- पुण्यभूषण दिवाळी अंकाचे उत्साहात प्रकाशन
ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन आज उत्साहात पार पडले. पुणेकरांचे लाडके हॉटेल असलेल्या हॉटेल वैशाली चे मालक जगन्नाथ शेट्टी आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान पान सेवा करणाऱ्या या हॉटेलच्या कामगारांना प्रकाशनाचा मान देण्यात आला. या सर्वांच्या हस्ते प्रकाशन झाले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती या प्रकाशन समारंभाला होती.
अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पुण्यातील यशस्वी साहित्य संमेलनानंतर पुणे शहरावर दरवर्षी दिवाळी अंक ‘पुण्यभूषण ‘ या नावाने काढण्याची अभिनव प्रथा डॉ सतीश देसाई यांनी साहित्य संस्कृती विश्वात सुरु केली.एका शहराला समर्पित असलेला हा एकमेव दिवाळी अंक मानला जातो.या परंपरेतील हा दहावा दिवाळी अंक आहे.
पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई म्हणाले, दरवर्षी आम्ही पुण्याला साजेशी संकल्पना घेवून प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो.यावर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या ‘वैशाली हॉटेल‘ या कट्ट्यावर प्रकाशन समारंभ करीत आहोत.
यावर्षीच्या अंकातील पहिले मानाचे पान जगन्नाथ शेट्टी यांना समर्पित करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख, आठवणी हे यावर्षीच्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुण्यभूषण अंकामुळे पुण्याची विशेष ओळख तयार झाली आहे. या दशकपूर्तिच्या निमित्ताने पुढील वर्षी तयार होणाऱ्या संग्राह्य खंडाच्या निर्मितीसाठी पालिका सहकार्य करेल. पुण्यभूषण दिवाळी अंकाला, परंपरेला पालिका भक्कम सहकार्य करेल. पुण्यातील जनजीवन, सण, परंपरा, सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं, हीच इच्छा आहे. तसे प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी या शहराची कोविड काळात काळजी घेतली. हे संकट लवकरच जाईल. पुण्याची सांस्कृतिक ओळख जगात पोहोचवू. पुण्यभूषणची सांस्कृतिक चळवळ त्यात उपयोगी ठरत आली आहे.