चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
फुटबॉल लव्हर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनायटेड ब्रदर्स, बीएलएफसी, साईराज एफसी व डीयूएफसी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून सुपर लीगमध्ये प्रवेश केला.
पहिल्या सामन्यात डीयूएफसीला आर्कम एफसीने 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात 18 व्या मिनिटाला किसन पाटीलने गोल करून डीयूएफसीला आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 70 व्या मिनिटाला आर्कमच्या फ्रान्सिसने गोल करून 1-1 अशी बरोबरी करून सामन्यात रंगत निर्माण केली. पण शेवटी हा सामना 1-1 अशा बरोबरीत राहिला. दुसऱया सामन्यात सीएससी संघाने युनायटेड ब्रदर्सला 1-1 असे बरोबरीत रोखले. 21 व्या मिनिटाला युनायटेड ब्रदर्सच्या आतिक मुल्लाने तर 27 व्या मिनिटाला सीएससीच्या धीरजने गोल केला. तिसऱया सामन्यात साईराज युएफसीने बीटा स्पोर्ट्स क्लबचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला साईराजच्या योगेश सांगावकरने पहिला, 26 व्या मिनिटाला निखील जाधवने दुसरा, 42 व्या मिनिटाला मंथन जी.ने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. बीटा स्पोर्ट्सच्या वॉल्टरने 61 व्या मिनिटाला गोल करून साईराजी आघाडी 1-3 अशी कमी केली. चौथ्या सामन्यात बीएलएफसीने अजित सीएफसीचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात बीएलएफसीतर्फे कौशिक पाटील, पिटर, ऍस्टन, ऋतुराज यांनी तर सीएफसीतर्फे वीकी गॉटमने गोल केला. मंगळवारी टॉप चार संघांमध्ये सुपरलीग स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.
मंगळवारचे सामने – 1) युनायटेड ब्रदर्स वि. व्हीएलएफसी 2) साईराज एफसी वि. डीयूएफसी.