बेळगाव :/ क्रीडा प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक लीग 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने आंनद चॅलेजर्स संघाचा 9 गडय़ांनी तर दैवज्ञ स्पोर्टस् संघाने मिलन वॉरियर्स हुबळीचा 72 धावांनी पराभव करून प्रत्येकी 3 गुण मिळविले. अष्टपैलू समर्थ शेट्टी (साईराज), ओम वेर्णेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियम जिमखाना मैदानावर गुरूवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आनंद चॅलेजर्सने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात सर्वबाद 95 धावा डाव गारद झाला. त्यांचे पहिले आघाडीचे सहा गडी केवळ 21 धावात तंबुत परतले. त्यावेळी अष्टपैलू ज्ञानेश्वर होनगेकर व जेनित मुडीबागील यांनी डावाला सांभाळत 95 धावापर्यंत पोहोचविले. त्यात ज्ञानेश होनगेकर 3 उंतुग षटकार व 4 चौकारासह 41, तर जेनितने 1 षटकार व 1 चौकारासह 19 धावांचे योगदान दिले.
साईराजतर्फे समर्थ शेट्टीने अचुक गोलंदाजी करत 23 धावात 3 गडी, फिरक ाr गोलंदाज आकाश असलकरने 12 धावात 3, सिध्दांत कदमने 22 धावात 2 तर वैभव कुरीबागीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल साईराज वॉरियर्सने 19 षटकात केवळ 1 गडी बाद 98 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. रोहित पाटील व वैभव कुरीबागी यांनी डावाला सांभाळत उत्कृष्ट फलंदाजी केली. वैभव कुरीबागी यांनी 2 षटकार 5 चौकारासह 46, रोहित पाटीलने 3 चौकारासह 37 धावा केल्या. आनंदतर्फे सुनील कुरीने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी बाद 172 धावा केल्या. किसन मेघराजने आक्रमक खेळी करत 1 षटकार 8 चौकारासह शानदार अर्धशतक झळकविले. त्याला अखिलेश वेर्णेकर व ओम वेर्णेकर यांनी प्रत्येकी 1 षटकार 3 चौकारासह 27 धावा, हर्ष फोजदारने 2 चौकारासह 16 धावा केल्या. मिलनतर्फे विजय हिरेमठने 35 धावात 2 तर पवन जलगार व सुदर्शन भावीकट्टी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल मिलन वॉरियर्सचा डाव 17.2 षटकात सर्वबाद 109 धावात गुंडाळला.
ओमरूपचंदानीने 5 चौकारासह 44, सुदर्शन भावीकट्टीने 12 धावा केल्या. देवज्ञतर्फे आदर्श कडेमनीने 13 धावात 2, तुषार चौगलेने 23 धावात 2, स्वयंम अप्पण्णावर व ताहा करदगी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अक्षय कुलकर्णी, सचिन कलवार, विक्रम देसाई, सचिन पुरोहित, नागराज भगवंतण्णावर, नासीर सनदी आदींच्या हस्ते समर्थ शेट्टी साईराज वॉरियर्स, ओम वेर्णेकर दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.