श्री चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित व्हीजलिंग वूड्स रिसॉर्ट पुरस्कृत श्री चषक निमंत्रितांच्या आंतरजिल्हा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात पांडुरंग सीसी चिकोडी संघाने नरवीर वडगाव संघाचा 1 गडय़ाने निसटता तर साईराज वॉरियर्सने मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाचा 24 धावानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मेहबूब सय्यद (पांडुरंग सीसी), माजीद मकानदार (साईराज) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात नरवीर वडगावने 12 षटकात 8 बाद 95 धावा केल्या. त्यात मुशाईदने 41 धावा केल्या. पांडुरंग सीसी चिकोडीतर्फे गिरीष पाटीलने 10 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल पांडुरंग सीसी चिकोडी संघाने 11.4 षटकात 9 बाद 96 धावा करून सामना 1 गडय़ाने जिंकला. त्यात बंडू भोसलेने 35 तर महंमद सय्यदने 3 षटकारासह 24 धावा केल्या. नरवीरतर्फे मतीन मुल्लाने 13 धावात 3 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. साईराज वॉरियर्सने 12 षटकात 7 बाद 92 धावा केल्या. माजिद मकानदारने 3 षटकार, 3 चौकारासह 44 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्स ग्रामीणतर्फे अभिजित पाटीलने 26 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाने 12 षटकात 9 बाद 68 धावाच केल्या. त्यात संतोष गावडेने 26 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे रब्बानी दफेदारने 12 धावात 3 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सुनील देसाई, अनंत सावंत, प्रवीण चंदगडकर, योगेश पाटील, अनिल देशनूर, आदिनाथ गावडे यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गुरूवारी साईराज वॉरियर्स वि. पांडुरंग सीसी चिकोडी यांच्यात अंतिम सामना होणार आहे. सामन्यानंतर बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, व्हिजलिंग वूड्स रिसॉर्टचे विनायक वैभव जाधव, किरण जाधव, जगजंपी बजाजचे मल्लिकार्जुन जगजंपी, मोहन मोरे, आनंद सोमनाचे आदी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला व्हिजलिंग वूड्स रिसॉर्टमध्ये दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंची एक दिवस, एक रात्र राहण्याची सोय करण्यात येणार आहे. मालिकावीरासाठी जगजंपी बजाजतर्फे सीटी 100 दुचाकी वाहन देण्यात येणार आहे तर सामनावीरासाठी योगेश लाड यांच्याकडून रेसिंग सायकलचे बक्षीस देण्यात येणार आहे.