वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्व भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रावरील ट्रेनिंग शिबिरे 3 मेपर्यंत लांबणीवर टाकली असल्याचे सांगितले. कोव्हिडविरुद्ध लढय़ासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशातील लॉकडाऊनची मुदत 3 मेर्ब्यंत वाढविल्यानंतर शिबिरे लांबणीवर हा निर्णय घेतला गेला आहे.
‘पहिल्या लॉकडाऊनमुळे 14 एप्रिलपर्यंत साई केंद्रावरील शिबिरे याआधी लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यामुळे 14 एप्रिलनंतर पुढील निर्णय घेण्याचे आम्ही ठरविले होते. पण आता लॉकडाऊन वाढविले असल्याने शिबिरेही 3 मेपर्यंत बंद राहतील,’ असे साईच्या सूत्राने सांगितले. मात्र भालाफेकपटू नीरज चोप्रासारख्या ऍथलेट्सना साईच्या हॉस्टेलमध्येच राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तो सध्या पतियाळातील केंद्रात सराव करीत आहे. गेल्या महिन्यात तुर्कीहून परतल्यापासून तो तेथेच सराव करीत आहे. ‘बेंगळूर व पतियाळातील केंद्रात असणारे खेळाडूंना तेथेच राहण्याची परवानगी देण्यात आली आहे,’ असेही या सूत्राने सांगितले.