वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा पुरूष बॅडमिंटनपटू साई प्रणितला सध्या बॅडबॅच मधून जावे लागत आहे. पुन्हा सुर मिळविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी स्पर्धामध्ये काही सामने जिंकल्यास आपला आत्मविश्वास पुन्हा वाढेल, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया थॉमस आणि उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी साई प्रणित सरावावर अधिक भर देत आहे.
डेन्मार्कमधील ऍरहस येथे 9 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पुरूष आणि महिलांची सांघिक थॉमस व उबेर चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा खेळविली जाणार आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताच्या साई प्रणितने जोरदार सराव केला होता. पण त्याला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. अलीकडेच फिनलँडमध्ये झालेल्या सुदीरमन चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धैत साई प्रणितकडून पुन्हा निराशा झाली. या स्पर्धेत चीनच्या युक्वीने साई प्रणितला प्राथमिक गटातील सामन्यात एकतर्फी पराभूत केले. 2019 विश्व बॅडमिंटन स्पर्धेत साई प्रणितने कास्यपदक मिळविले होते.
भारतीय बॅडमिंटनपटूंना आता पाठोपाठ होणाऱया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. थॉमस आणि उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेनंतर 19 ते 24 ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा तसेच त्यानंतर 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान प्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे.