उच्च न्यायालयाचा समिती स्थापणाऱ्यांना दणका
प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी येथील साई मंदिरावर कमिटी नेमण्याचा ठराव करण्यात आला होता. त्याविरोधात ओम श्री साई समाज यांनी उच्च न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज दाखल केला होता. त्याठिकाणी न्यायालयाने त्या ठरावाला स्थगिती दिली असून बेकायदेशीर समिती नेमणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
साई मंदिरावर कमिटी नेमण्याचा ठराव 31 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आला होता. यावेळी धर्मादाय खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीतच हा ठराव केला होता. यापूर्वीही दाखल केलेला एक खटला उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आता न्यायालयाने त्या ठरावाला स्थगिती दिल्यामुळे साऱ्यांचीच कोंडी निर्माण झाली आहे.
साई मंदिरावर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर अ श्रेणीमध्ये असलेले हे मंदिर ब श्रेणीमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे त्याठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते. तीन वर्षांपासून त्याठिकाणी विविध कामांसाठी खर्च करण्यात आलेल्या रकमेमध्ये गैरप्रकार झाला होता. त्यामुळे ओम साई समाजातर्फे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात आल्यानंतर आता तत्कालीन प्रादेशिक आयुक्तांनी त्याठिकाणी प्रशासक म्हणून तहसीलदार सारिका शेट्टी यांची नियुक्ती करण्याबाबत बेंगळूरच्या धर्मादाय आयुक्तांकडे शिफारस केली आहे.
साई मंदिरामध्ये दानपेटीला कुलूप लावण्यात येत नाही. मंदिरामध्ये टेलिफोन नाही. याचबरोबर तक्रारींचा बॉक्सदेखील नाही. या मंदिरामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, अशा तक्रारी अनेकवेळा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर न्यायालयाने त्या कमिटीलाच स्थगिती दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयामध्ये ओम श्री साई समाजातर्फे अॅड. श्रीवत्स हेगडे यांनी काम पाहिले.