क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
केरळ येथे झालेल्या 32 व्या साऊथ झोन राष्ट्रीय ज्युनियर ऍथलेटीक्स स्पर्धेत बेळगावच्या स्टँडर्ड अकादमीचा खेळाडू व मण्णूर गावचा सुपुत्र तुषार भेकणे याने 1500 मी. धावण्याच्या स्पर्धेत नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.
1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तुषारने अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते. अंतिम फेरीत अनेक राष्ट्रीय विजेत्या स्पर्धकांचा त्यामध्ये सहभाग होता. पण तुषारने या सर्वाना मागे टाकत नव्या विक्रमासह प्रथम क्रमांक पटकावला. त्याने याआधीचा 4.013 वेळेचा विक्रम मागे टाकत 4.01 वेळेचा नवीन स्पर्धाविक्रम नोंदविला. त्याला स्टँडर्ड स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, शिरीष सांबरेकर यांचे मार्गदर्शन तर वडील वसंत भेकणे यांचे प्रोत्साहन मिळत आहे. तुषारकडून बेळगावकरांच्या अपेक्षा वाढल्या असून, राष्ट्रीय स्पर्धेत अशीच चमक दाखवून बेळगावचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा केली जात आहे.