प्रतिनिधी /काणकोण
काणकोण पालिका क्षेत्रातील साखरेव्होळ या भागात जलस्रोत खात्याने बांधलेला बंधारा बुजवून त्या ठिकाणी रस्ता तयार करण्याचे काम सध्या चालू असल्याचा दावा करून या प्रकाराबद्दल स्थानिक शेतकऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराची त्वरित चौकशी करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक धीरज ना. गावकर यांनी जलस्रोत खात्याकडे केली आहे.
येथील एका जमीनमालकाने आपली जमीन एका बाहेरच्या व्यक्तीला विकली असून या जमिनीच्या परिसरात स्थानिक शेतकरी शेती तसेच भाजीपाल्याची लागवड करत आलेले आहेत. ज्याने सदर जमीन विकत घेतली आहे त्याने जेसीबीचा वापर करून जमीन सपाट केली आहे आणि रस्ता तयार करताना जलस्त्रोत खात्याने शेतकऱयांसाठी उभारलेला बंधारा बुजविला आहे, असा दावा स्थानिक शेतकऱयांनी केला आहे. या प्रकाराची खबर मिळताच देळे येथील शेखर देसाई, लक्ष्मण शेट, प्रवीण देसाई आणि नगरसेवक धीरज ना. गावकर यांनी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. स्थानिक शेतकरी येताच जेसीबीचालकाने तेथून पळ काढला, अशी माहिती नगरसेवक गावकर यांनी दिली. या प्रकाराची त्वरित चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.