सुहास पाटील / उंडाळे :
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेला शेअर खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये मोजावे लागणार आहेत.राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्याच खिशात हात घालायचं राज्य सरकारने ठरवलंय.
आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्यांचा एक शेअर खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये मोजावे लागणार आहेत . आतापर्यंत शेतकऱ्यांना अशा एका शेअरसाठी दहा हजार रुपये मोजावे लगत होते . राज्यातील पंच्याण्णव सहकारी साखर कारखान्यांचे मिळून बावीस लाखांहून अधिक सभासद आहेत. त्यामुळं शेअरची किंमत वाढवल्याने सहकारी साखर कारखान्यांसाठी कोट्यवधी रुपये उभे राहणार आहेत .कारखान्यांचे स्वभांडवल वाढविण्यासाठी शेअरची रक्कम पंधरा हजार केली असुन यामुळे कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीसाठी भांडवल उभारणीसाठी बँकाकडे जावं लागणार नसल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.