नॅशनल फेडरेशनकडून द्धितीय क्रमांकाचा पुरस्कार
प्रतिनिधी / मसूर
देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणाऱया, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज्, नवी दिल्ली या संस्थेकडून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.
देशाला परकीय चलन उपलब्ध होऊन, अर्थव्यवस्था मजबुत होण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याबाबत जाहीर केलेल्या योजनेंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने चेअरमन, राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गर्शनाखाली 5 लाख 80 हजार 730 क्विंटल इतक्या मोठय़ा प्रमाणात साखरेची निर्यात केलेली आहे. ही साखर निर्यात सन 2019-20 सालाच्या साखर उत्पादनाच्या 42 टक्के आहे. त्याबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज्, नवी दिल्ली या संस्थेने कारखान्यास सदरचा पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे वितरण मार्च 2021 मध्ये मुख्य अतिथींच्या हस्ते ‘साखर उद्योगासमोरील जागतिक आव्हाने व भारतातील साखर उद्योगाच्या नाविन्यपूर्ण वाढीस दृष्टिकोन’ या विषयावरील परिषदेत समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. कारखान्यास सदरचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन, नामदार बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.