सात नगरसेवकांच्या स्वाक्षऱया नगराध्यक्षांपाठोपाठ उपनगराध्यक्षा लक्ष्य. नगरपालिकेला पूर्णपणे भाजपमय करण्यावर भर
डिचोली / प्रतिनिधी
साखळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांना नगराध्यक्ष पदावरून खाली उतरविल्यानंतर आता सत्ताधारी गटाने विरोधी गटाकडून उपनगराध्यक्ष पद हिसकावून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून या धगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा कुंदा माडकर यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल करण्यात आली आहे. सदर अविश्वास ठरावावर सत्ताधारी गटातील सात नगरसेवकांच्य स्वाक्षऱया आहेत. नगराध्यक्षपदी यशवंत माडकर यांची निवड झाल्यानंतर आता उपनगराध्यक्ष पद हातात घेऊन नगरपालिका भाजपमय बनविण्याच्या कार्याला वेग आला आहे.
माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्याविरोधात या नगरपालिकेतील यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, राजेश सावळ, ब्रह्मानंद देसाई, रश्मी देसाई, शुभदा सावईकर या नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता. व तो विशेष बैठकीत संमतही करण्यात आला होता. त्यावेळी मात्र धर्मेश सगलानी गटातील सहापैकी पाच नगरसेवक उपस्थित राहिल्याने त्यांचे ऐक मत घटले होते. नगरसेवक दामू घाडी हे बैठकीस अनुउपस्थित राहिले होते. व नंतर ते सत्ताधारी गटात सामील झाले होते.
नगराध्यक्षपदासाठी संपन्न झालेल्या निवडणुकीवेळी नगरसेवक राजेश सावळ हे अनुपस्थित राहिल्याने सत्ताधारी गटातील एक मत घटले होते. यशवंत माडकर विरूद्ध धर्मेश सगलानी अशी निवडणूक झाली आणि यशवंत माडकर यांनी 7 विरूद्ध 5 अशा मतफरकाने बाजी मारली. या निवडीवेळी नगरसेवक राजेश सावळ यांच्या अनुपस्थितीमुळे सत्ताधारी गटासमोरील संभाव्य पेच दामू घाडी हे सत्ताधारी गटात सामील झाल्याने टळला. मात्र राजेश सावळ यांची अनुपस्थिती या पालिका राजकारणात वेगळेच वळण घेणारी ठरणार अशी चर्चा करण्यास भाग पाडत होती. आज धर्मेश सगलानी गटात त्यांच्यासह उपनगराध्यक्षा कुंदा माडकर, ज्योती ब्लेगन, अन्सिरा खान, राया पार्सेकर असे पाच जण आहेत. उपनगराध्यक्षा माडकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर नगराध्यक्ष यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, ब्रह्मानंद देसाई, रश्मी देसाई, शुभद सावईकर व दामू घाडी या नगरसेवकांच्या स्वाक्षऱया आहेत. उपनगराध्यक्षा कुंदा माडकर या आपल्या वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असल्याने नगरपालिकेला वेळ देऊ शकत नाहीत. तसेच इतर नगरसेवकांबरोबर सहकार्य करीत नसल्याने त्याचा परिणाम साखळीच्या विकासावर पडतो. अशी कारणे सदर अविश्वास ठरावात नमूद करण्यात आली आहेत. या अविश्वास ठरावावर नगरसेवक राजेश सावळ यांची स्वाक्षरी नसूत ते सध्या य राजकारणापासून अलिप्त राहिल्याचे दिसून येत आहे.