दुकाने, कार्यालये, रिक्षासह चारचाकी वाहतूक बंदचे आवाहन
प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठीसह उपनद्यांतील गाळ उपशाबाबत येथील प्रांत कार्यालासमोर सुरू असलेले साखळी उपोषण मंगळवारी सोळाव्या दिवशीही सुरूच आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ चिपळूण बचाव समितीने 22 रोजी चिपळूण बंदची हाक दिली असून त्यात दुकाने, कार्यालये, रिक्षासह चारचाकी वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांनी निधीबाबत शब्द दिल्याने नागरिकांच्या नजरा बुधवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाकडे लागल्या आहेत.
गाळासंदर्भात मंत्रालय पातळीवर तसेच मंगळवारी येथे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गोगरे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत निधीबाबत ठोस तरतूद होत नाही आणि गाळ काढण्याबाबतची गतिमान कार्यवाही दिसत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या समितीने केला आहे. त्यामुळे भीक मांगो आंदोलन, निषेध मूक मोर्चानंतर समितीने बुधवारी चिपळूण बंदचे आवाहन केले आहे. त्यामध्ये बाजारपेठ पूर्णतः बंद असणार आहे. तसेच रिक्षा, चारचाकी वाहनांनाही वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाळासाठी सुरू असलेले उपोषण हे पुढच्या पिढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सुरू असलेले प्रत्येक आंदोलन हे शासनाला जागे करण्यासाठी आहे. त्यामुळे जनतेने सुरू असलेल्या या लढय़ाला सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे.
या चिपळूण बंदमध्ये केमिस्ट असोसिएशनही सहभागी होणार आहे. तालुक्यातील सर्व औषध दुकाने दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे स्वतःला लागणारी औषधे नागरिकांनी अगोदरच आणून ठेवावीत. दरम्यान, या काळात कुठलाही अपघात अथवा इतर कारणासाठी तत्काळ औषधे लागल्यास समीर वाजे (7276743948), निहार गुढेकर (9822154444), प्रवीण देशमुख (9423047735) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन असोशिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिवेशनाकडे नजरा
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणातील नद्यातील गाळ काढण्यासाठी 1 हजार कोटींची मागणी करणार असल्याचे भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी येथील उपोषणस्थळी जाहीर केले होते. तसेच चिपळूणचा गाळाचा प्रश्न अधिवेशनात मांडून न्याय देऊ, असे आश्वासन विरोधी पक्षनेते दरेकर यानी बचाव समितीला दिले होते. बुधवारपासून अधिवेशन सुरू होत असल्याने आता चिपळूणकराच्या नजरा या अधिवेशनात गाळासाठी काय तरतूद होते, याकडे लागल्या आहेत.
संगमेश्वर बाजारपेठ आज दुपारनंतर राहणार बंद
संगमेश्वर ः महामार्गावरील संगमेश्वर बाजारपेठ व आठवडा बाजार आज बुधवारी सकाळच्या सत्रात सुरूच राहणार असून दुपारनंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. चिपळूण बचाव समितीने पुकारलेल्या बंदला संगमेश्वर व्यापारी संघाने पाठिंबा दिल्याचे पत्र दिले आहे. आठवडा बाजारात ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यासंदर्भात ग्राहकांची गैरसोय टाळणे तसेच किरकोळ व्यापाऱयांचा नाशवंत माल खराब होऊ नये म्हणून संगमेश्वर व्यापारी संघाने बंदला पाठिंबा देत सकाळच्या सत्रात दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र दुपारनंतर ही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत व्यापारी संघाचे अध्यक्ष बापू भिंगार्डे यांनी चिपळूण तालुका बचाव समितीला पत्र दिले आहे. देवरुख बाजारपेठ सुरूच राहणार असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.