साहित्य, मशीनरी जळून खाक : 70 लाखांचे नुकसान
प्रतिनिधी/कुपवाड
कुपवाड एमआयडीसीलगत सावळी हद्दीतील फरसाणा व बेकरी उत्पादन करणाऱया हरीओम फूड प्रोडक्ट्स या कारखान्याला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत कच्चा व तयार उत्पादन तसेच मशिनरी जळून खाक झाल्याने 70 लाखाचे नुकसान झाल्याचे कंपनी मालक सुरेश माळी यांनी सांगितले. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निग्नशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने तीन तासांनी आग आटोक्यात आली. या दुर्घटनेत जिवीत हानी झालेली नाही.
याबाबत माहिती अशी, सांगलीतील उद्योजक सुरेश माळी यांचा सावळी हद्दीत हरीओम फूड प्रॉडक्टस् नावाने फरसाणा व बेकरी पदार्थ निर्मितीचा कारखाना आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक कंपनीच्या छतातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. आगीचा संशय आल्याने भितीने कामगाराची धावपळ उडाली. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने याबाबतची माहिती तातडीने माळी यांना दिली. माळी यांनी कंपनीकडे धाव घेऊन अग्निग्नशमन दलाला पाचारण केले. अग्निग्नशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. आगीत कच्चा व तयार झालेला फरसाणा, बेकरी उत्पादन व मशिनरी यांचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाल्याने कंपनीमालक हताश झाले होते. घटनेची माहिती कळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.