45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीडनाही लसीकरण
कोमॉर्बीड गटात लक्षणे नसतील तर लस नाहीच..
कृष्णात पुरेकर, कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधक लसीकरण तिसर्या टप्प्यात जेष्ठ नागरीक, कोमॉर्बीड रूग्णांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दीही वाढत आहे. 45 ते 59 वयोगटात ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, अशांना ही लस मिळणार नाही. पण यातील कोमॉर्बीड असलेल्यांना लस मिळणार आहे. साठीनंतर लक्षणे नसली, कोणताही त्रास नसला, तरी हायरिस्क फॅक्टर म्हणून सर्वच ज्येष्ठांना लस देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
साधारणतः साठ वर्षांनंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे साठीनंतरच्या सर्वच ज्येष्ठ नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. शासकीय रूग्णालयांत मोफत तर खासगी हॉस्पिटल्समध्ये 250 रूपयांत ती उपलब्ध आहे. नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑन दी स्पॉट नोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, आरोग्य कर्मचार्यांकडून मदत केली जात आहे. याशिवाय तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, शिक्षकांद्वारे माहिती देण्यात येत आहे. कोवीन 2.0 ऍपशिवाय आयटी ऍप आरोग्यसेतू मधूनही नोंदणी करता येणार आहे. कोमॉर्बीड, व्याधीग्रस्तांसाठी 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीड लाभार्थ्यांना नोंदणीवेळी नोंदणीकृत डॉक्टरांचे पत्र सादर करावे लागणार आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्यूदर नियंत्रित करण्यासाठी प्राधान्याने हायरिस्क फॅक्टरला लस देण्यात येत आहे. यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्तांचा समावेश आहे. साधारणतः 20 घटकांशी निगडीत व्याधी असलेल्यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात 60 वर्षांवरील 5 लाख 9 हजार ज्येष्ठ नागरीक आहेत. तर 45 ते 60 वयोगटातील 1 लाख 52 हजार 948 व्याधीग्रस्त आहेत. कोरोना काळात केलेल्या आयुष सर्वेक्षणातून ही यादी प्रशासनाला मिळाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोवीन 2.0 ऍप आहे. येथे कोमॉर्बीडची नोंदणी करताना लक्षणे नसतील तर ऍप नोंदणी घेत नाही. त्यामुळे डॉक्टरांचे प्रमाणपत्र महत्वपुर्ण आहे. त्यामुळे व्याधीग्रस्तांनाच ही लस मिळणार आहे. दुसरीकडे साठी ओलांडली असली तरी आणि रक्तदाब, मधुमेह अन्य कोणताही त्रास नसला, तरी ज्येष्ठ नागरीकांना कोरोना लस मोफत दिली जाणार आहे. यामागे साठी ओलांडताच हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. त्यामुळे अशा व्यक्तींना कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. या हायरिस्क फॅक्टरमधील संभाव्य मृत्यूदर रोखण्यासाठी, जिल्ह्याचा मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी हे लसीकरण आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांनी लक्षणे असोत, नसोत, कोणताही त्रास नसला, तरी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी अपेक्षीत लाभार्थी संख्या - 60 वर्षांवरील 5 लाख 9 हजार, 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीड : 1 लाख 52 हजार 948, एकूण : 6 लाख 61 हजार 948