अधिकाधिक कोरोना चाचण्यांवर भर : शासकीय कर्मचाऱयांना स्वॅब टेस्ट सक्तीची : ई पास अजूनही अनिवार्यच
- चेक पोस्टवरील डॉक्टरांना कोविड सेंटरमध्ये नियुक्त्या
- आणखी 14 रुग्णांना डिस्चार्ज, सक्रिय संख्या 459
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, नगरपालिका आणि तहसील कार्यालयांमधील काही कर्मचाऱयांना कोरोना लागण होऊ लागल्याने सर्व कर्मचाऱयांना स्वॅब टेस्टिंग करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तर चाकरमान्यांचा ओघ कमी झाल्याने सर्व चेकपोस्टवरील डॉक्टरना आता कोविड सेंटरमध्ये नियुक्त्या देण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी येथे दिली. जिल्हय़ात रुग्णसंख्या वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना नमुना तपासणीवर अधिकाधिक भर देण्यात आला असून कोरोनाची लक्षणे दिसणाऱया व्यक्तींनी तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सोमवारी जिल्हय़ात आणखी 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 997 झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये आठ दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शिक्षण विभाग बंद करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य, समाजकल्याण, पशुसंवर्धन, वित्त विभागांतील काही कर्मचारी आणि अधिकारी मिळून आठ ते दहाजणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारीवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद काही दिवसांसाठी बंद ठेवावी, अशी मागणीही होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले असता जिल्हा परिषद पूर्णपणे बंद ठेवण्यापेक्षा जि. प. च्या सर्व कर्मचाऱयांची कोरोना तपासणी करणे योग्य ठरणार आहे. त्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना सर्व कर्मचाऱयांच्या स्वॅब टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. तसेच वैभववाडी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, कुडाळ पंचायत समिती, वेंगुर्ले तहसील कार्यालय व काही नगरपालिका कार्यालयांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही कार्यालये बंद न ठेवता ती निर्जंतूक करून घेण्यात यावी. सर्व कर्मचाऱयांची कोरोना तपासणी करून घेण्यात यावी, अशा सूचनाही अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य यंत्रणा न कोलमडण्याची दक्षता
जिल्हा रुग्णालयातील चार वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हय़ातील काही खासगी डॉक्टर, आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. तरीही आरोग्य यंत्रणा कोलमडणार नाही, याची पूरेपूर दक्षता घेण्यात येत असून जिल्हा शल्य चिकिमत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची बैठक घेऊन आवश्यक त्या ठिकाणी डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली.
ई-पास काढणे अजूनही अनिवार्यच
केंद्र शासनाने ई-पास रद्द करण्याबाबतचे आदेश दिले असले, तरी राज्य शासनाने अद्यापही ई-पास रद्दचे आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे ई-पास शिवाय कुणालाही जिल्हय़ाबाहेर जाता येणार नाही किंवा जिल्हय़ात येता येणार नाही. 30 ऑगस्टनंतर शासनाच्या धोरणात बदल झाल्यास ई-पास रद्द होऊ शकतो, असेही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हय़ात आणखी 60 पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्हय़ात सोमवारी आणखी 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या 997 झाली आहे. तसेच सोमवारी आणखी 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 523 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत कोरोना सक्रीय रुग्ण 459 आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि तालुक्याच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. रुग्ण वाढल्याने कंटेनमेंट झोनमध्येही वाढ झाली असून नव्याने 28 कंटेनमेंट झोन वाढल्याने जिल्हय़ात एकूण 132 कंटेनमेंट झोन झाले आहेत.
या गावातील आहेत 60 पॉझिटिव्ह रुग्ण
सोमवारी जिल्हय़ात नव्याने 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यात सर्वाधिक 31 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये कलमठ 12, कणकवली सात, खारेपाटण पाच, वरवडे चार आणि करुळ तीन. वैभववाडी तालुक्यात एक रुग्ण आढळला असून तो वैभववाडीमधील आहे. देवगड तालुक्यातही एकच रुग्ण आढळला असून तो जामसंडेमधील आहे. कुडाळ तालुक्यात सात रुग्ण आढळले असून त्यात ओरोस पाच आणि रानबांबुळी दोन. वेंगुर्ले तालुक्यात तेरा रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण वेंगुर्ले शहरातील आहेत. सावंतवाडी तालुक्यात सहा रुग्ण आढळले असून यात सावंतवाडी तीन, बांदा, आकेरी आणि तळवडे प्रत्येकी एक अशी रुग्णसंख्या आहे. दोडामार्ग तालुक्यात एक रुग्ण आढळला असून तो दोडामार्गमधीलच आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 11587
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 997
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 10510
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 115
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 459
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 15
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 523
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 14905
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4202
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 201758
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 132