तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
साडी वाटपाचा बहाना करून शहरामध्ये दोन ठिकाणी महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास कोतंम चौक येथील गांगजी शोरूमच्या बोळात घडली. फिर्यादी निर्मला शंकर कटकधोंड (वय 55, रा. माशाळ वस्ती, आत्मविश्वास नगर) या कोंतम चौक येथून पायी जात असताना आरोपीने फिर्यादीस भाभी भाभी असे हिंदीमध्ये बोलून हात करून बोलावून घेतले. सणानिमित्त साड्या वाटप करीत आहोत. तुम्ही पुढच्या दुकानात जाऊन साडी घ्या, असे सांगितले. तुमच्या कानातील सोने पाहिल्यावर ते साडी देणार नाहीत, तेव्हा तुमच्या कानातील सोन्याचे दागिने काढून ठेवा, असे सांगितले. सोने काढल्यानंतर रुमालमध्ये व्यवस्थित बांधून देतो, असे सांगून भामट्याने त्यांचे सोन्याचे दागिने हातात घेतले आणि दागिने व रोख रक्कम रुमालात बांधल्यासारखे करून तो फिर्यादीच्या पिशवीत टाकला. त्यानंतर त्यापुढे गेल्यानंतर त्यांच्या पिशवीतील रुमालामध्ये 36 हजार रुपयांचे सोन्याचे झुबे, कानातील वेल व फुले तसेच 9 हजारांची रोकड असा एकूण 45 हजारांचा मुद्देमाल भामट्याने पळवून नेला असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. अधिक तपास पोलीस हवालदार थोरात हे करीत आहेत.
त्यानंतर वृद्धेला लुटण्याची दुसरी घटना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास चाटी गल्ली राठी हॉस्पिटलच्या बोळात घडली. फिर्यादी शंकरव्वा सिद्राम लोणीकर (वय 70, रा. हनुमान नगर भवानी पेठ) या धुणीभांडी करण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांना हाक मारून आमच्या आजीचे वर्षश्राध्द आहे. त्याकरता आम्हाला वृद्ध महिलांना साडी वाटप करावयाचे आहे, आमची आजी अंगावर सोन्याचे दागिने घालत नव्हती त्यामुळे तुम्ही तुमच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा तुम्हाला साडी दिल्यानंतर तुम्ही ते परत दागिने घाला, असे सांगितले. त्यामुळे सोन्याची कर्णफुले व व सोन्याचे मनी असलेली पोत स्कार्पमध्ये बांधल्याचा बहाना करून भामट्याने दागिने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीस तुम्हाला साडी ठेवण्यासाठी पिशवी आणून देतो असे सांगून त्याने पलायन केले. पोलीस हवालदार शेख हे अधिक तपास करीत आहेत. शहरात दोन ठिकाणी घडलेल्या फसवणुकीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.