प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर परिसरात किरकोळ चोऱ्या होतच असतात पण चोरट्यांनी आता चक्क विद्युत वाहिनीतील 4 लाख 72 हजार 500 रुपये किंमतीची तांब्याची तार चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. साताऱ्यातील एमआयडीसी परिसरात सातारा ते रहिमतपूर रस्त्यावर असलेल्या सावकार कॉलेज ते एनिनन्स ऍग्रो कोल्ड स्टोअरेज दरम्यान विद्युत वाहिनी टाकण्यात आलेली आहे. या वाहिनीतील एक हजार 80 मीटर लांबीची व 450 रुपये प्रतिकिलो दर असलेली तांब्याची तारच अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली आहे. याबाबत प्रशांत सहदेव यादव (वय 25 रा. ठक्कर सिटी, गोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.