तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
येथील गवताळ मानराने हे जैवविविधतेच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्याचे वैभव आहे . त्यावरील कीटक, भक्ष्य हे परदेशी पाहुण्या पक्ष्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे हिवाळ्यात स्थलांतर करीत युरोप,रशिया,कझाकीस्तान येथून चार ते साडेचार हजार किलोमीटर चा प्रवास करीत हमखास सोलापूरला येणाऱ्या पक्ष्यांमध्ये ‘भोवत्या’ हा पक्षी आहे . त्यांचा शास्त्रीयदृष्ट्या सर्वांगाने अभ्यास करण्यासाठी आलेल्या बंगळुरू येथील ‘एट्री’ या संस्थेच्या पक्षीतज्ञांनी मागील आठवड्यात अशा तीन पक्ष्यांना ‘जीएसएम सोलार टॅग ‘ लावून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याची सुखद घटना सोलापूरच्या नान्नज पक्षी अभयारण्यात घडली. यावेळी नेचर कॉन्झर्वेशन सर्कल चे भरत छेडा, पप्पू जमादार, डॉ प्रतीक तलवाड, तरुण जोशी, निलेश जोशी, आदित्य घाडगे, अकबर शेख, शुभम अक्षंतल, रवी म्हंता, सोमनाथ पवार आदी उपस्थित होते.
लाखमोलाची टॅग भोवत्या पक्ष्याला बसविण्यात आलेल्या जीएसएम सिम आणि त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरसह एका पक्ष्याला अडीच लाख रुपये खर्च येतो. भोवत्या च्या अभ्यासासाठी मागील पंधरा वीस दिवसांपासून प्रिन्सिपल इन्व्हेस्टीगेटर टी गणेश आणि प्रशांत, पक्ष्यांसंदर्भात पीएचडी करणारे अर्जुन कन्नन ,आणि त्यांचे सहकारी चीयान हे तामिळनाडू चे पक्षी अभ्यासक सोलापूर मुक्कामी आहेत . बंगळुरुस्थित ‘एट्री ‘या संस्थेच्या वतीने भारतातील राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक या पांच राज्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. |