उचगाव /प्रतिनिधी
कोल्हापूर हुपरी रस्त्यावर उचगाव हद्दीत गडमुडशिंगी जवळ असणाऱ्या सातबारा हॉटेलमध्ये गांधीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून अवैद्य मद्य साठा जप्त केला.बिअरचे बॉक्स व पाचशे रुपये रोख असा एकूण ४६०१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याबाबत गांधीनगर पोलीसांत हॉटेल मालक व चार कर्मचारी अशा पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
हॉटेल मालक राहूल शंकर सावंत(वय ३४ रा.मणेरमळा उचगांव ),सतिश शहाजी इंगळे(वय ३० रा.सांगवडेवाडी) ,ओंकार राजू जाधव(वय १९ रा.बोरपाडळे ता.पन्हाळा) ,विकास प्रभाकर डांगे( वय १९रा.लवंगे ता.मंगळवेढा,सोलापूर ), कुमार रामकृष्ण बनसोडे( वय २९ रा.कचरेवाडी ता.मंगळवेढा सोलापूर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
गडमुडशिंगी जवळ उचगांव हद्दीत सातबारा हॉटेल मध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. हॉटेल किचनचे पाठीमागील खोलीत हे बिअर बॉक्स पोलिसांना मिळाले. लॉकडाऊन काळात मद्य विक्रीवर बंदी असतानाही ही या हॉटेलात साठा अवैधरित्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. ट्युबर्ग,बेक आईस बिअर,बडवायझर बिअर,किंगफिशर तसेच लंडन प्लिझनर बिअर व रोख पाचशे रुपये असा एकूण ४६०१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याबाबत पोलिस नाईक शशिकांत रामहरी जाधवर यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गांधीनगर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम,मुरलीधर लांगी यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस नाईक हांगे करीत आहे.