1 ते 6 वी बरोबरच 9 वीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी होणार उत्तीर्ण
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऐन परीक्षा काळातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. परिणामी 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाने इ. 7 वी ते इ. 9 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले असून इ. 1 ते 6 वी बरोबरच 9 वीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षेतील विषयानुरुप गुणांवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे तर एसएसएलसी परीक्षचे वेळापत्रक 14 एप्रिलनंतर जाहीर करण्यात येणार आहे.
2019-2020 या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेच्या काळातच कोरोनामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. परिणामी इ. 1 ली ते 6 वीच्या परीक्षादेखील अपूर्णच राहिल्या. सदर इयत्तेच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील शैक्षणिक वर्षात नवीन इयत्तेत प्रवेश देण्यात यावा, असे जाहीर करण्यात आले. मात्र इ. 7 वीची बोर्डाची परीक्षा व इ. 8 वी व 9 वी परीक्षेबाबत निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. गुरुवारी कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाचे शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे जाहीर केले असून परीक्षा होणार की नाही या संभ्रमावस्थेत असणाऱया विद्यार्थी-पालकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
एसएसएलसी परीक्षेचे नवे वेळापत्रक
27 मार्चपासून एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे परीक्षा झाली नाही. यामुळे 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठताच परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. या आदेशामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतची दिशा मिळाली असून परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. दहावीबरोबरच बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपरदेखील घेण्यात येणार आहे. यामुळे परीक्षेबाबत संभ्रम न बाळगता विद्यार्थ्यांनी घरी रहा सुरक्षित रहा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.