अबु धाबी/ वृत्तसंस्था
गुणतालिकेत सातव्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्ससमोर आज (दि. 2) आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचे तगडे आव्हान असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने यापूर्वी गुरुवारी सनरायजर्स हैदराबादला नमवत या हंगामात प्ले-ऑफसाठी सर्वप्रथम स्थान निश्चित केले असून सध्या ते 11 सामन्यात 18 गुणांसह अव्वलस्थानी आहेत. आजची त्यांची लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यावर 16, आरसीबीच्या खात्यावर 14 गुण आहेत. 11 सामन्यात 8 गुणांसह राजस्थानचा संघ सातव्या स्थानी फेकला गेला असून आज पराभव पत्करावा लागला तर बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची त्यांची उरलीसुरली आशाअपेक्षा देखील संपुष्टात येईल.
उरलेले तीनही सामने मोठय़ा फरकाने जिंकले तरच राजस्थानला प्ले-ऑफमधील चौथे स्थान निश्चित करण्याची संधी असेल, असे चित्र स्पष्ट आहे. अर्थात, चेन्नईसारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असताना राजस्थानला आव्हानांचा डोंगर सर करावा लागेल, हे निश्चित आहे. चेन्नईने मागील सलग चारही सामने जिंकले असून येथेही तीच घोडदौड कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यांनी मागील 4 लढतीत मुंबई इंडियन्सला 20 धावांनी, आरसीबीला 6 गडी राखून, केकेआरला 2 गडी राखून नमवले तर मागील लढतीत हैदराबादला देखील धूळ चारली.
राजस्थानसाठी मात्र या हंगामात हॅट्ट्रिक पराभव पत्करावा लागल्यानंतर बरीच समीकरणे बदलून गेली आहेत. संजू सॅमसनच्या संघासाठी स्पर्धेतील अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला असून ही संधी गमावल्यास त्यांचे या हंगामातील आव्हान संपुष्टात येण्याचा धोका असणार आहे.
संभाव्य संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, इव्हिन लुईस, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, ओशेन थॉमस, मुस्तफिजूर रहमान, तबरेझ शमसी, ग्लेन फिलीप्स, चेतन साकरिया, रियान पराग, राहुल तेवातिया, आकाश सिंग, अनुज रावत, केसी करिअप्पा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयांक मार्कंडे, जयदेव उनादकट, कुलदीप यादव, महिपाल लोमरोर.
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
सामन्याची वेळ- सायं. 7.30 वा.