तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मानाच्या पहिल्या व दुसऱया नंदीध्वजास रविवारी रात्री 12 नंतर साज चढविण्यात आले, तर नंदीध्वजाला लोणी, हळद, पाटल्या, हिरडय़ांनी सजवून यण्णीमंजनासाठी नंदीध्वज सज्ज झाले. पहाटे पोळीचा नैवेद्य दाखवून यात्रेच्या मुख्य धार्मिक विधीला प्रारंभ झाला. सोमवारी सातही मानाच्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीने 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यात येणार आहे.
श्री सिद्धरामेश्वरांच्या मुख्य यात्रेला यण्णीमंजनाने सुरुवात होत असून, रविवारी मध्यरात्री मानाच्या पहिल्या व दुसऱया नंदीध्वजाला हळद मिश्रित लोणी, चंदन, हिरडे, पाटल्या, झुंबर, खेळणी बांधून सजविण्यात आले. मानाच्या सातही नंदीध्वज सोमवारी सकाळी 8 वाजता हिरेहब्बू वाडय़ातून 68 लिंगाच्या तैलाभिषेकासाठी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात एकत्र येतात. श्री सिद्धरामेश्वरांच्या गर्भमंदिरास प्रदक्षिणा घालून पहिले लिंग अमृतलिंगाच्या तैलाभिषेकाने मुख्य विधीस प्रारंभ होईल. मंदिर परिसरातील 17 लिंगाच्या तैलाभिषेकानंतर होम मैदान, डफरीन चौक, स्टेशन रोड, पोस्ट ऑफिस, नरसिंग गिरजी मिल, मेकॅनिक चौक, पांजरापोळ, धरमशी चाळ, भोगडे वस्ती, बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवार पेठ, मीठ गल्ली, वारद पाठशाळा, भुसार गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, बेगम पेठ, हरिभाई प्रशाला, लकी चौक, नवी वेस, मेकॅनिक चौक, पांजरापोळ चौक, काळी मशिद, चौपाड आणि रात्री 9 वाजता मल्लिकार्जुन मंदिरात हे नंदीध्वज येणार आहेत. श्री मल्लिकार्जुन मंदिरात महाआरती व मानकऱयांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी 13 तास लागणार असून, जवळपास 21 कि. मी. अंतर नंदीध्वजधारक व मानकऱयांना पायी चालत हा विधी पूर्ण करावा लागणार आहे.
तंबाखू, गुटखा, मावा खाणाऱयांना नंदीध्वज पेलण्यास विरोध
शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत नंदीध्वजधारक व मानकऱयांना विशेष मान आहे. यापूर्वी काही नंदीध्वजधारक हे गुटखा, तंबाखू, मावा सेवन करुन नंदीध्वज धरत होते. ही बाब यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी यंदापासून अशा व्यसनी नंदीध्वजधारक व मानकऱयांना सज्जड दम देत यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसे नंदीध्वजधारक यंदा आढळल्यास हिरेहब्बू काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.