वार्ताहर / सातार्डा:
सातार्डा-मुंबार्डेवाडी येथील शाळकरी मुलगा अनुराज केशव मयेकर (10) याचा सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान तेरेखोल नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मुंबार्डेवाडीतील अच्युत मयेकर, दाजी मयेकर यांनी अनुराजला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. चार दिवसांपूर्वी कास येथील तरुण तेरेखोल नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तेरेखोल नदीपात्रामध्ये दुसरी दुर्घटना घडली आहे. अभ्यासात हुशार असलेल्या अनुराजच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मुंबार्डेवाडीत शोककळा पसरली आहे.
सोमवारी सकाळी तेरेखोल नदी पात्रालगत अनुराज व त्याचा मोठा भाऊ पुंडलीक नेहमीप्रमाणे गुरे राखण्यासाठी गेले होते. अनुराजने तेरेखोल नदीपात्रात उतरुन पोहण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला. अनुराज पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच नदी किनारी असलेला त्याचा मोठा भाऊ पुंडलीक याने जोरदार आरडाओरडा केली. त्यानंतर जवळच गुरांची राखण करीत असलेले शेतकरी अच्युत मयेकर, दाजी मयेकर यांनी तात्काळ धाव घेत नदीपात्रात उडी घेतली. बुडत असलेल्या अनुराजला सातोसे-दुर्गवाडी येथील ‘पोयचे मुख’च्या खारबंधाऱयाजवळ वाचविण्याचा प्रयत्न करून वर काढले. अनुराजच्या पोटातील पाणी बाहेर काढले. मात्र, त्या आधीच तो मृत्यूमुखी पडला होता. अनुराज हा सातोसे-दुर्गवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये चौथीत शिक्षण घेत होता. अभ्यासात तो हुशार होता. अनुराजच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मुंबार्डेवाडीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजोबा, काका, काकी असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच सातार्डा गावचे प्रभारी सरपंच भरत मयेकर, माजी सरपंच उदय पारिपत्ये, सातोसे सरपंच बबन सातोसकर, ज्ञानदीप राऊळ, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर व अनुराजच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तुकाराम मयेकर यांनी या बाबत बांदा पोलिसांना माहिती दिली. पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय हुंबे व विजय जाधव यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा शोकाकूल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.