प्रतिनिधी/ सातारा
चालू दशकातील शेवटचे कंकणकृती सूर्यग्रहण दिसावे, यासाठी सातारकर सकाळपासून सज्ज झाले होते. पण, ढगाळ वातावरणामुळे या सूर्यग्रहणाचे ओझरते दर्शन मिळाले. हे दर्शन पाहण्यासाठी कॅमेरा, गॉगल, मोबाईल फोन सोबत एक्सरे फिल्मचा वापर करण्यात आला.
रविवारी दि 21 जून रोजी चंद्राच्या सावलीचे मार्गक्रमण पृथ्वीवरून आफ्रिका खंडाकडे सुरू झाला आहे. हा उत्तर गोलार्थातील सर्वात मोठा दिवस ठरला आहे. याचे प्रतिबिंब आशियाई खंडातील देशासोबत अरब राष्ट्राच्या भागात दिसले आहे. या सुर्यग्रहणाचे दर्शन घेण्यासाठी सातारा जिह्यात अनेकजण डोंगर पठार व बाल्कनी, टेरिसवर वाट पाहत होते.
ढगाळ वातावरणामुळे अनेकांना पूर्ण सूर्यग्रहण पहाता आले नाही. दुपारी दिड वाजल्यानंतर आभाळ स्वच्छ दिसत होते. सूर्यग्रहण उघडय़ा डोळ्यांनी पाहू नये याची वारंवार पालकवर्गाकडून सूचना केली जात होती. तर सुर्यग्रहणामुळे कोणताही मानवी जीवनात प्रतिक्रिया उमटत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱया विद्रोही सांस्कृतिक चळवळ संघटनेच्या माध्यमातून लोकांनी विशेषतः सातारकरांनी अंधश्रद्धा न बाळगता या सुर्यग्रहणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करून जनजागृती केली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
सातारा जिह्यातील ग्रामीण भागात साचलेले पाणी, आरसा व गुळगुळीत फरशीवर या सुर्यग्रहणाचे प्रतिबिंब पाहून आपल्या मनातील उत्सुकता पूर्ण केली. तर काहींनी जुन्या एक्सरे फिल्मचा वापर सूर्यग्रहण पाहण्यासाठी करून उघडय़ा डोळ्यांनी ग्रहण पाहणे टाळले आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता, अशी माहिती साताऱयातील ग्राफिक डिझायनर प्रज्ञा विलास वहागावकर यांनी दिली.