मंगळवारी 930 कोरोनामुक्त, जिल्ह्यात 35 बळी, 973 बाधित
नागरिकांना हवाय विश्वास, दिलासा, ‘माझे कुटुंब’ मोहीम सुरु सहकार्य करण्याचे आवाहन
‘कृष्णा’ला प्लाझ्मा थेरपीस मान्यता सातारा, कराडसह सर्वत्र वाढ सुरुच
‘कृष्णा’मध्ये कोरोनामुक्ती 1500 पार, ऑक्सिजन बेडची कमतरता
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोनाची एवढी गंभीर स्थिती होईल असे वाटत नसल्याने जिल्हावासिय तसे जूनपर्यंत बेफिकीर होते. मात्र, गेल्या दोन, तीन महिन्यात जी स्थिती समोर आलीय त्यामुळे वातावरण पॅनिक झालेय. शरीरातील ज्या ऑक्सिजन पातळीचा कधीच उल्लेख झाला नाही ती चेक करण्याची वेळ आली. त्याच ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने नागरिकांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण आहे. काळजी घेतल्यास संसर्ग टाळता येतो व कोरोना बराच होतो ही भावना नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी प्रशासनाने तो विश्वास व दिलासा देण्याची सध्या प्रचंड गरज आहे. तो ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या जिल्हय़ात सुरु करण्यात आलेल्या मोहिमेतून दिला पाहिजे.
दरम्यान, जिह्यात सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार 898 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 35 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे तर सायंकाळी आलेल्या अहवालात 930 नागरिकांनी कोरोनावर मात केली तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 973 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 930 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 930 नागरिकांना घरी सोडण्यात आले. रिकवरी रेट वाढू लागला असून कोरोना मुक्तीच्या आकड्याने 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 16,524 जणांनी कोरोनावर केलेली मात दिलासा देणाारी ठरली आहे.
कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता
पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढय़ात महत्वाची भूमिका बजाविणाया कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल जिह्यातील एकमेव रूग्णालय असून या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे. जिह्यातील पहिली चाचणी लॅब, कोरोना लस संशोधनात सहभागी असणारी जिह्यातील एकमेव संस्था अशी कामगिरी करणाऱया कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र अन्न व औषध प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे.
मोहिमेला सहकार्य करा : पालकमंत्री बाळसाहेब पाटील
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम 15 सप्टेबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत सर्व्हे करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीचे वय, आरोग्याची परिस्थिती, ऑक्सीजन लेवल यांची तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी, गप्पा मारताना, जेवण करताना सुरक्षित अंतर ठेवणे, या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेय.
मोहिमेचा चांगला उपयोग होईल : मंत्री शंभुराज देसाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेचा राज्यात शुभारंभ होत आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे या भावनेतून कोरोनापासून बचाव कसा करावयाचा याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. मास्क वापरणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सतत हात धुणे, जिथे हात धुण्याची व्यवस्था नसेल अशा ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे याची जागृती व्हावी हा या उद्देश आहे. या मोहिमेचा संसर्ग रोखण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.
6 लाख 80 हजार कुटुंबांचा सर्व्हे होणार
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिह्यातील 6 लाख 80 हजार कुटुंबाना आरोग्य पथके भेटी देणार आहेत. नागरिकांनी प्रश्नांची खरी उत्तरे द्यावीत. कोरोना संसर्गाबाबत जनजागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेंतर्गत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याची सर्व माहिती सांगण्यात येणार आहे. जिह्यातील युवक, युवतींनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
‘कृष्णा’मध्ये कोरोनामुक्ती 1500 पार
कृष्णा हॉस्पिटलमधून मंगळवारी 39 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलचा कोरोनामुक्तीचा आकडा 1,500 पार गेला असून, आजअखेर 1,539 रुग्णांना यशस्वीपणे डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जनता कर्फ्यूने प्रशासनाचे काम हलके
जिल्हय़ातील लोणंद, वाई, मेढा, वडूज, म्हसवड, सायगाव, कुडाळ, केळघर, करहर, काशीळ, पुसेगाव, कोरेगाव, उंब्रज, चिंचणेर, परळी, नागठाणे, फलटण तालुक्यातील पवारवाडी, गोखळी, मुंजवाडी, खटके वस्ती आसू अशा ग्रामीण भागात ही जनता कर्फ्यु सुरु आहे. जनता प्रशासनाचे काम हलके करण्याचा प्रयत्न करु लागलीय. कोरोना बरा होतो मात्र प्रशासनाने जनतेच्या मनातील भीती घालवण्याची गरज आहे. तेवढा विश्वास व दिलासा त्यात वाटला पाहिजे.
मृतांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक
सोमवारी 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक असून जिल्हय़ाला ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागणार आहे. मृतांमध्ये जिल्हा रुग्णालय सातारा येथे साकर्डी ता. कराड 72 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ सातारा 64 पुरुष, रहिमतपूर 65 वर्षीय पुरुष, नित्रळ सातारा 80 वर्षीय पुरुष, अतित 86 वर्षीय पुरुष, नुने सातारा 70 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा 58 वर्षीय पुरुष, पंताचा गोट सातारा 84 वर्षीय महिला, शाहुपरी 76 वर्षीय पुरुष, सासुर्वे कोरेगाव 53 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा 43 वर्षीय महिला, मेढा ता. जावली 75 वर्षीय पुरुष, करंजे सातारा 69 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे ता. कोरेगाव 88 वर्षीय पुरुष, चाफळ 71 वर्षीय पुरुष, कुमठे ता. खटाव 63 वर्षीय महिला. विविध खासगी हॉस्पीटलमध्ये औंध ता. खटाव 67 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण 48 वर्षीय महिला, शाहुपरी सातारा 69 वर्षीय पुरुष, पुणे 74 वर्षीय महिला, कोरेगाव 72 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण 60 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला व 82 वर्षीय पुरुष, माण 75 वर्षीय महिला, पळशी ता. माण 77 वर्षीय महिला, कडेगाव सांगली 51 वर्षीय पुरुष, भरतगाव 85 वर्षीय पुरुष, कोरेगाव 75 वर्षीय पुरुष, नावडी, ता. पाटण 82 वर्षीय पुरुष, कराड 70 वर्षीय पुरुष, शाहुनगर 55 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली 73 वर्षीय पुरुष, हुमगाव ता. जावली 80 वर्षीय पुरुष असे एकूण 35 जणांचा समावेश आहे.
883 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, उपजिल्हा रुग्णालय कराड 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 80, वाई 126, खंडाळा 73, रायगाव 80, पानमळेवाडी 118, महाबळेश्वर 85, खावली 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 171 असे एकूण 883 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 57,369
एकूण बाधित 26,449
एकूण कोरोनामुक्त 16,524
एकूण मृत्यू 725
उपचारार्थ रुग्ण 9,200
मंगळवारी
एकूण बाधित 973
एकूण मुक्त 930
एकूण बळी 35