प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संख्या 21 वर पोहचली आहे. यामुळे सातारकरांना अधिक सर्तक राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या सुधारित वेळा जाहीर केल्यानंतर दररोज खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यामुळे सातारकरांना सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ कळेना असेच म्हणावे लागत आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसने जिह्यातही शिरकाव केला आहे. यांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू असून लोकांना ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदीची मुभा आहे. सुरूवातीला सकाळी 8 ते 11 आणि रात्री 7 ते 9 अशा वेळा निर्धारित करण्यात आल्या होत्या. मात्र बाधितांचा आकडा वाढतच असून लॉकडाऊनच्या अनुषंगाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून दि. 22 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा, बँका व शासकीय कार्यालयासाठी निर्धारित वेळ लागू केली आहे. सकाळी 9 ते 2 अशी सुधारित वेळ आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे जिह्यातील मांसाहार प्रेमींचे मटण व चिकन बंद झाल्यामुळे मोठी अडचण झाली होती. मात्र नव्याने निर्धारित वेळेत मटण-चिकन घरपोच मिळणार असल्यामुळे जिह्यातील अनेक मांसाहार प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
याच पार्श्वभूमीवर खरेदीच्या नावाखाली लोकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण दोन दिवसांपासून वाढले आहे. वस्तू एका तासात खरेदी करता येतात. मात्र काही लोक दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात विनाकारण फिरताना दिसत आहेत. तसेच घराबाहेर पडताना संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना घेवून बाहेर पडण्यात येत आहे. खरेदीच्या वेळी तोंडाला मास्क लावले जात असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नाही. पोलीसांकडून वारंवार सुचना करता येत आहेत. तरीही याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. या वाहनधारकांची वाहने जप्तीची धडाका सुरूच ठेवला आहे. तरीही यांना जाग येत नसल्याने कोरोना हद्दपार कसा होणार अशी चिंता निर्माण झाली आहे.
पोलीसांवर हल्ले वाढले…
संचारबंदीचे नियम मोडले जाऊ नये म्हणून पोलीसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून शहरात पोलीसांवर हल्ले करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकांनी असे कृत्य न करता सहकार्य करावे असे वारंवार पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे.