शहरात चौकाचौकात नाकेबंदी : संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न :
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. साखळी रोखण्यासाठी प्रशासन तयारी करत आहे. त्यामुळे सातारा शहरात येण्याकरिता फक्त दोनच रस्ते खुले ठेवले आहेत. त्यामुळे जे बिनकामाचे आणि कामानिमित्त बाहेर पडत आहेत.ते गोलगोल फिरत पुन्हा त्याच ठिकाणी येत आहेत. तोपर्यंत त्यांच्या गाडीतले पेट्रोल सपंत आहे. पोलीस मात्र चौकाचौकात तळ ठोकून अवघ्या सातरकरांची राखण करत आहेत. आता बुधवारी साताऱयात एक कोरोनाबाधित महिला आढळून आली असून सातारकरोंना, आता शहाणे व्हा, असाच संदेश ही परिस्थिती देत आहे.
सातारा शहर हे जिह्याचे ठिकाण आहे. जिह्यातील कराड आणि जावली तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने त्या त्या भागात 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत तरी सातारा शहराला अजून कोरोनाचा स्पर्श नव्हता. जो रुग्ण कॅलिफोर्निया येथून आला होता तो खेड गावच्या हद्दीतील होता. सातारा शहरात अजून ही सेफ आणि सुरक्षित समजले जात होते मात्र आता सदरबझारमध्ये एक महिला कोरोना बाधित आढळून आल्याने दक्षता घ्यावीच लागणार आहे.
शहरात उपचार देणारे जिल्हा रुग्णालय आहे. शहरातील सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन दिलतोड मेहनत घेत आहे. सातारा जिह्यातील आकडा वाढत असताना सातारा शहराला कुठे ही बाधा होऊ नये याकरता गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरात येण्यासाठी केवळ दोनच प्रवेशद्वार खुली ठेवली आहेत. एक मोळाचा ओढा आणि दुसरे बॉम्बे रेस्टॉरंट चौक. या ठिकाणींही पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.
पुणे बंगलोर महामार्गवरून कोणीही मोळाचा ओढा मार्गे शहरात घुसखोरी करू नये यासाठी केबीपी कॉलेजजवळ पोलिसांची नाकेबंदी आहे. मोळाचा ओढा येथे आहे. वाढे फाटा येथे नाकेबंदी आहे. सदरबजार येथील नागरिकाला जर विनाकारण किंवा कामानिमित्त राजवाडा येथे जायचे असेल तर तो पोवई नाका येथपर्यंत जातानाच रस्त्याला चौकाचौकात लावलेल्या आडव्या बांबूमुळे गोल गोल फिरत कसातरी पोवई नाक्यावर पोहचतो तर तेथे ही तीच परिस्थिती दिसते. पोलीस मुख्यल्याकडे जाणारा रस्ता बंद केला आहे.
शहरात सर्वत्र नाकाबंदी
सातारा शहरात उपनगरांसह सर्वत्र नाकाबंदी करण्यात आलेली आहे ती कोरोनापासून बचाव करण्यासाठीच. तहसीलदार कार्यालयाकडे येणारा रस्ता बंद केला आहे.राजपथकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. तेथून पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयामार्गे बसस्थानाकडून तहसीलदार कार्यालयाकडे यायला गेल्यास तेथे बंद केले आहे. पोलीस मुख्यालयाकडे जाण्याचा मार्ग पंतांच्या गोटातून सुरू आहे. वरच्या रस्त्याला पालिकेकडे गेल्यास शाहू चौकातून कमानी हौद येथे ही रस्ता बंद केला आहे. पुढं देवी चौकात रस्ता बंद केला आहे. वरती न्यु इंग्लिश स्कुलकडे जाणारा रस्ता बंद आहे.
विनाकारण बाहेर पडूच नका
मोती चौकात गोल बागेकडे जाणारा रस्ता बंद आहे. युनियन भाजी मंडईच्या समोर असलेला मंगळवार तळ्याकडे जाणारा रस्ता बंद आहे. बुधवार नाक्यावर सदाशिव पेठेत येणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे जरी सातारकर घरातून बाहेर पडले तरीही गोलगोल फिरत राहुन पुन्हा आहे त्याच ठिकाणी येताना दिसतात.गाडीतले पेट्रोल मात्र रिकामी होणार हे नक्की आणि पोलिसांची चौकचौकात उभे असल्याने टुकार नागरिकांचा चांगलाच बटय़ाबोळ झाला आहे.
बोगद्यातून अत्यावश्यक सेवावाल्यांना सोडा
दळणवळण असलेला रस्ता म्हणजे बोगदा. हा रस्ता पूर्णपणे बंद केल्याने शहराला सुविधा देणाऱया पालिकेचे बहुतांशी कामकाज हे बोगद्यातून पलिकडे शहापूर उपसा योजना, पॉवर हाऊस येथे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱयांना जावे लागते तर शहरातील कचरा गोळा केलेल्या घंटा गाडय़ांना सोनगाव कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी बोगदा मार्गे जावे लागते. मात्र आता पोलिसांनी बोगद्यातून वाहतूक बंद केल्याने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून महामार्गावरुन खिंडवाडीतून जावे लागत आहे.