प्रतिनिधी / सातारा
सध्याचा जमाना फास्ट फुडसारखा झाला आहे. घरातील पतीपत्नी दोघेही नोकरीला असल्यावर दिवाळीचा फराळ घरात बनवायला वेळ नसतो. साताऱ्यात मात्र घरगुती दिवाळी फराळ तयार करून घरपोच करण्याची सेवा सुरू आहे. चक्क सातारा येथील घरघुती बनवलेली दिवाळीचा फराळ चक्क ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीला पोहचला आहे.
अलीकडे घरात दिवाळीचे लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा करायला वेळच आहे कोणाला. रेडिमेड फराळ फक्त ऑर्डर देताच घरपोच मिळू लागला आहे. सातारा येथील मिठाईच्या दुकानात तर दिवाळी फराळ मिळतोच पण काही महिला बचत गट व महिला हे फराळ तयार करून घरोघरी पोचवण्याचे काम ही होत आहे. सातारा शहरात ही रेडिमेड फराळ मिळतोच. पण महिला बचत गटांनी तर आता मिठाई दुकानांच्या ही पुढे दोन पाऊले जात दिवाळीचा फराळ घरपोच करण्याची पद्धत सुरू केली आहे. चक्क जर्मन आणि ऑस्ट्रेलिया येथे दिवाळीचा फराळ सातारा येथून पोहच झाला आहे.
लाडू खावा तर डोंगरे काकूंच्या हातचा
सातारा शहरात 1999 पासून दिवाळीच्या फराळ घरात तयार करून लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे देणाऱ्या दीपाली हेमंत डोंगरे या. अगदी कृष्णानगरच्या पाटबंधारे कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांच्या दिवाळी फराळाची चव अधिकारी, कर्मचारी आवर्जून सांगतात. एवढेच नाही तर जेष्ठ विधिज्ञ ऍड.धैर्यशील पाटील हे ही आवर्जून सांगतात की लाडू खावे तर डोंगरे कांकूच्या हातचेच. डॉ.हर्षे हे तर दरवर्षी यांच्याकडून दिवाळी फराळ नेतात. त्याबाबत डोंगरे कांकूंच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मी 1999 पासून दिवाळी फराळ बनवण्याचा व्यवसाय करते आहे. दसऱ्याला यादी तयार करते. आता व्हॉट्सअप आले आहे. पूर्वी वहीत लिहून ठेवून दिवाळीपूर्वी मागणीनुसार पोहच करत होते. अगदी सातारा शहरात कुठे ही डॉकटर, वकील, अधिकारी यांना माझ्याकडील दिवाळी फराळाची माहीती आहे, असे त्यांनी सांगितले.