प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजे हे नेहमीच सस्पेन्स ठेवत असतात. आताही उपनगराध्यक्ष निवडीवेळी त्यांनी असाच सस्पेन्स कायम ठेवला होता. फक्त एकदम जवळच्याच माणसांना कोणाचे नाव अर्ज भरण्यास सांगितले आहे हे त्यांनी सांगितले होते. अगदी पावणे बारापर्यंत साविआतील काही पदाधिकाऱयांनाही नाव माहिती नव्हते. 12 वाजता अर्ज दाखल करण्याच्या पाच मिनिटं अगोदर मनोज शेंडे हे पालिकेत बनकर यांच्याबरोबर आले अन् त्यांनी अर्ज दाखल केला. शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, साविआत गटतट अजून ही असल्याचे दिसून आले. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा माधवी कदम यांनी काम पाहिले.
सातारा पालिकेत किशोर शिंदे यांच्या रिक्त जागी उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम गुरुवारी पालिकेत पार पडला. ऑनलाईन व्हीसीद्वारे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार उदयनराजे यांनी नेहमीप्रमाणे सस्पेन्स ठेवला होता. उपनगराध्यक्ष कोण होणार आहे?, कोणाला अर्ज भरायला सांगायचे हे फक्त त्यांनी स्वीकृत नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांच्यासह काही मोजक्याच शिलेदारांना सांगितले होते. अगदी पावणे बारा वाजले तरीही कोणाला अर्ज भरायला सांगितला आहे हे साविआतल्या प्रमुख मंडळींना आणि मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही माहिती नव्हते. अखेर 12 वाजायला पाच मिनिटं बाकी असताना मनोज शेंडे यांचा अर्ज भरण्यात आला. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पहात ऑनलाईन व्हीसीद्वारे त्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. मनोज शेंडे यांना नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या केबिनमध्ये सुरुवातीला फुलांचा बुके देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, किशोर शिंदे, धनंजय जांभळे, दीपलक्ष्मी नाईक, सुनिल काळेकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, राजू भोसले, बाळासाहेब ढेकणे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांना सभागृहात नेऊन नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
ढेकणे यांनी शेंडे यांना मारली मिठी
बाळासाहेब ढेकणे आणि मनोज शेंडे दोघेही करंजे येथीलच असून. बाळासाहेब ढेकणे हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी मनोज शेंडे यांना मारलेली मिठीची जोरदार चर्चा सुरू होती. जेणेकरून बाळासाहेब ढेकणे हे शाहुपुरी भागात मोडतात. शाहूपुरी भाग हद्दवाढीत आला आहे. स्वीकृत म्हणून सभागृहात असणार हेच बाळासाहेब ढेकणे यांना या मिठीतून सांगायचे तर नसेल ना, अशी ही चर्चा सुरू होती.