प्रतिनिधी / गोडोली :
साताऱ्यात गेल्या काही दिवसापासून काळ्या रंगाची ब्लॅक फिल्मींग असलेल्या एका चार चाकी गाडीवर आमदार स्टिकर्स लावलेले दिसते. सदर गाडीची माहिती घेतली असता ती एका मुंबई येथील कंपनीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. मात्र ‘सातारच्या गल्लीबोळातून हा कोण आमदार फिरतोय,’ हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सातारच्या वाहतूक पोलीसांनी आत्तापर्यंत वाहतूक नियमांचे उल्लंघन केले की ‘चुकीला माफी नाही, दंड हा भरलाचं पाहिजे’, हे अभिनेता अमीरखान वर कारवाई करून हिसका दाखवून दिले आहे. तर थेट शिवतीर्थावर अनेक गाडय़ांच्या काचांचे फिल्मींग अनेकांचे टराटरा फाडून कर्तव्य दक्ष असल्याचे दाखवून दिले होते. बदली झाली तरी बेहत्तर अशा पोलीस निरीक्षक हांडे यांनी तर एका तत्कालीन आमदार यांच्या वाहनांवर याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्यावर कारवाई केली होती, ते प्रकरण चांगलेचं गाजले होते. मात्र त्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांची बदली झाल्यापासून वाहतूक पोलीस शाखा जरा नरमले आहेत.
सध्या अनेक फुटकळ दादा, गाव पुढारी, भावी नगरसेवकांनी सेकन्ड हँण्ड चारचाकी गाडय़ा घेऊन त्याच्या काचांना डार्क फिल्मींग करून घेतले आहे. काही गाडय़ांना नंबर प्लेट नाहीत, काही फॅन्शी नंबर प्लेट, बनावट नंबर असल्याचे दिसते.
साताऱ्यात सध्या काळ्या रंगाच्या गाडीवर ‘आमदार स्टिकर्स’ लावून एक चार चाकी लक्षवेधून घेत आहे. त्यात काळ्या काचा असल्याने आत कोण आणि किती जण समजून येत नाही. सदरच्या नंबर वरुन शोधले असता पासिंग सातारचे आणि मुंबई येथील कंपनीच्या नावावर असल्याचे समोर आले. मात्र एवढय़ा ‘लो बजेट’ गाडीतून कोण आमदार सातारच्या गल्लीबोळातून सतत फिरतोय, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. याबाबत ” तरुण भारत” ने माहिती दिल्याने संबंधितांकडून सदरच्या आमदाराचा शोध सुरू झाला असल्याचे समजते.