सलग पाच तास आसन केल्याची एबीवायएम योगा बुकमध्ये नोंद
प्रतिनिधी / सातारा
कोरोनामुळे माणसांची जीवनशैली बदलली गेली. लॉकडाऊन काळात माणसांनी खाण्यापिण्याबरोबरच व्यायामाला अधिक महत्व दिले. जिम, व्यायामशाळा बंद असल्यामुळे घरीच सूर्यनमस्कार, योगा असे व्यायाम करुन आपली तंदुरुस्ती कायम ठेवण्यात अनेकजण प्रयत्न करत होते. याच कोरोनाकाळात झालेल्या योगा स्पर्धेत सातारच्या कु. जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने ‘एबीवायएम योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये 5 तास सिद्धासन हे आसन करुन नवा विश्वविक्रम केला आहे. योगामध्ये हे साताऱयातील पहिले वर्ल्ड रेकॉर्ड असल्याने जगात सातारच्या नावाचा डंका वाजत आहे.
कु. जान्हवी जयप्रकाश इंगळे या योगा ट्रेनर असून 12 वर्ष योगा करत आहेत. गेल्या 5 वर्षापासून योगा शिकवत असून पतंजली सहयोग शिक्षक, लेवल 2 योगा ट्रेनर असून कोरोना काळात 21 जून 2020 इंटरनॅशनल योगा डे रोजी फ्री योगा क्लास घेतला त्याबद्दल त्यांचा आयुष मंत्रालय भारत सरकार वायसीबीतर्फे योगा केअर हे सर्टिफिकेट देवून गौरव करण्यात आला.
जान्हवी यांचे शिक्षण बीए व डिप्लोमा कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग इंजिनिअर झाले असून इंटरनॅशनल कंपनीसोबत बिझनेस करतात. जिह्यात कोरोना दाखल झाल्यानंतर यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू झाले. या लॉकडाऊनमध्ये सर्वांनाच घरात राहणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे सर्वांच्या मनावर काळजीचे भितीचे सावट निर्माण झाले. कोरोनाचा कहर कमी होण्याचा विचार सगळेच करत होते. पण सातारची जान्हवी इंगळेने आपल्या योगा मार्फत दररोज वाटचाल सुरू ठेवत फ्री योगा क्लास घेतले. लॉकडाऊनच्या आधी कॉलेजच्या 350 मुलींना फ्री योगा ट्रेनिंग दिले आहे. आणि लॉकडाऊन काळातही ऑनलाईन योगा क्लास घेतले. काही तरी वेगळे करुन कुटुंबाचे आणि सातारा जिह्याचे देशात नाव उंचवावे हि भावना आधीपासूनच मनात होती आणि या दरम्यान संधी चालून आली.
जान्हवी यांना सोशल मीडियावरुन वर्ल्ड रेकॉर्डविषयी माहिती मिळाली. त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. लॉकडाऊनमुळे हे रेकॉर्ड ऑनलाईन पार पडणार होते. यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. ऑगस्ट महिन्यात त्यांनी ऑडिशन दिली. या ऑडिशनमध्ये त्यांची निवड झाल्यावर 13 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रेकॉर्ड पार पडले. जान्हवी इंगळे यांनी सिद्धासनाचे सलग पाच तासाचे रेकॉर्ड केले. ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्ड झाले. संपूर्ण ऑफलाईन व्हिडिओ रेकॉर्डिग आणि माहिती कुरिअरने पाठवण्यात आली. पाठवलेली माहिती व्हिडिओ हे सगळे वर्ल्ड रेकॉर्ड टिमने पाहून मान्य केले. आणि कुरियरने गोल्ड मेडल सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे. या रेकॉर्डसाठी वर्ल्ड रेकॉर्ड टिमकडून त्यांना याबद्दल गोल्ड मेडल सर्टिफिकेट योगा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर बॅच टि शर्ट देण्यात आले.
आत्तापर्यंत जान्हवी या अनेक मॅरथॉन रनमध्ये सहभागी झाल्या असून त्यांची ती आवड आहे. तसेच आयवायएसएफ स्वित्झर्लंड या योगा स्पर्धेतही सहभाग घेतला होता. एशिया योगा चॅम्पियनशिप अशा अनेक योगा स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे.
या रेकॉर्डसाठी एबीवायएम योगा बुकचे सीईओ व फाऊंडर राकेश भारद्वाज, आई-वडील, बहिणी, मित्र, मैत्रीण, आदित्य मोरे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद कार्यवाह राजेश मोरे, डॉ. शुभांगी मोरे, शकिल शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सातारचे माजी उपनगराध्यक्ष कै. जे. पी इंगळे आणि कै. शकुंतला इंगळे यांच्या त्या नात असून सातारा नगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य जयप्रकाश इंगळे यांच्या त्या कन्या आहेत. सिद्धासन हे आसन घेऊन या आसनामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करून योगामध्ये जागतिक नवा विक्रम करणाऱया जान्हवी या साताऱयामधील पहिल्या युवती आहेत.