प्रतिनिधी / खंडाळा
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या नावाचा वापरून काही जण जिल्हा परिषद व इतर ठिकाणी कामकाज करताना दिसत आहेत.यापुढे संघाच्या नावाचा बेकायदेशीर वापर होताना आढळल्यास संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करु असा इशारा संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ यांनी दिला आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची स्थापना स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि देशातील सर्व शिक्षक यांनी काम केले आहे. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ हा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यत काम करत आला आहे. मध्यंतरी संघटनांच्या विविध घडामोडीनंतर काही संघटना अधिकृत संघटनेच्या नावाचा वापर करून वावरत आहे. कायदेशीररित्या हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात राज्य संघटनेने सातारा जिल्ह्याची कार्यकरणी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केली आहे. तरी ही अधिकृत संघटनेचे नाव वापरून काही जण जिल्हा परिषद आणि इतर ठिकाणी कामकाज करताना दिसत आहे. यापुढे संघटनेच्या नावाचा बेकायदेशीर वापर होताना आढळल्यास संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा प्रसिद्धीसी दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
शिक्षण समितीवर अधिकृत संघटनेचा प्रतिनिधी हवा !
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून राज्याच्या धोरणानुसार अधिकृत संघटनेचे प्रतिनिधी घेतले जावे, अशा पध्दतीचा ठराव आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या समितीवर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी घेण्यात यावा. अशीही मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.