प्रतिनिधी / नागठाणे :
अतीत (ता.सातारा) येथील चोरट्या दारूधंद्यावर व काशीळ (ता.सातारा) येथे चोरट्या मटका अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई करत 2277 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, दोन संशयित पळून गेले. शुक्रवारी सायंकाळी उशिरा या कारवाया करण्यात आल्या.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अतीत गावच्या हद्दीत अंकुश शिवाजी सावेकर (रा.अतीत,ता.सातारा) हा चोरून दारूविक्री करतो अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे अचानक छापा टाकला.यावेळी पोलिसांना पाहताच अंकुश सावेकर याने तेथून पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून 832 रुपये कींमतीच्या 16 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
काशीळ येथे एस.टी स्टॅंडच्या आडोश्याला चोरून बाळू विष्णू पवार (रा.सासपडे,ता.सातारा) व सतीश शिवाजी साळुंखे (रा.बोरगाव,ता.सातारा) हे राजधानी नाईट मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाल्यावर तेथेही कारवाई केली. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून बाळू विष्णू पवार याला ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत सतीश शिवाजी साळुंखे पळून गेला. पोलिसांनी तेथून रोख रक्कम, स्लीपा असा 2445 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यांची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.