कराड / प्रतिनिधी :
मलकापूर येथील आगाशिवनगरमधे (ता. कराड) चोरट्यांनी एक घर फोडले तर दुसरे घर फोडण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे घडलेल्या या प्रकारची गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या परिसरात नोव्हेंबर महिन्यातच चार घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे अभिनव कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी परिसरात घरफोडीचे सत्र कायम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील त्रिमुर्ती कॉलनीत अशोकराव कदम यांच्या बंगल्याचा चोरट्यांनी कडीकोयंडा तोडला. चोरटे आत शिरले. आतील फाईल्स, इतर साहित्य विस्कटले. चोरट्यांनी किरकोळ साहित्य घेऊन पोबारा केला. सोमवारी सकाळी कॉलनीतील विलास मोहिते, शंकर मोरे,बाबासाहेब ढेबे यांना दरवाजा उघडा दिसल्याने शंका आली. त्यांनी कदम यांना फोन केला. दरम्यान चोरट्यांनी शेजारच्याच कॉलनीतील विकास पाटील यांचे बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारील एका रहिवाशींनी आरडाओरडा केल्यावर चोरटे पळाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
कराड शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संजय जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, प्रफुल्ल गाडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.