अखिल भारतीय बँड व बेंजो संघटनेच्या जिल्हाध्यक्ष योगेश माने यांनी केली मागणी
प्रतिनिधी/सातारा
गेल्या मार्च महिन्यापासून बँड व बेंजो व्यवसाय पूर्णपणे संकटात सापडला आहे. कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. बँड व बेंजो व्यवसाय करणाऱ्यांना शासनाने अनुदान द्यावे अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय बँड व बेंजो संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना दीपक जाधव, अजित माने, संतोष जाधव, रवींद्र चव्हाण, गणेश साळुंखे, संभाजी माने आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बँड व्यावसायिकांचा हंगाम पूर्णपणे लॉक डाऊन च्या काळात वाया गेला आहे.जिल्ह्यात 800 ते 900 बँड व्यावसायिक आहेत.एका ताफ्यात 25 कलाकार असतात.ते शुभ कार्याची शोभा वाढवत असतात.हे सर्व कलाकार मागासवर्गीय आहेत.त्यांना कोणतेही शासनाचे अनुदान नाही.कोरोनामुळे व्यवसाय सुरू नाही.हाताला काम नाही.उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी.कलाकाराना लोक कलेचा दर्जा देण्यात यावा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.