प्रतिनिधी / नागठाणे
जुन्या भांडणाचा कारणातून दोन खाजगी आरामबस चालकांमध्ये मारामारी होऊन एक चालक गंभीर जखमी होण्याची घटना एक आठवड्यापूर्वी घडली. याची फिर्याद रविवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशियाई महामार्गावरील माजगाव फाटा (ता.सातारा) येथील हॉटेल राजमुद्रा हॉटेलवर ही घटना घडली. राजकुमार विवेक कोंढर (रा.बावधन,ता.हवेली.जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार कोंढर हे साई ट्रॅव्हल्स कंपनीची आरामबस घेऊन १५ नोव्हेंबरला रात्री कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. १६ नोव्हेंबरला पहाटे १.३० च्या सुमारास माजगाव फाटा येथील हॉटेल राजमुद्रा येथे ते चहा -नाश्त्यासाठी थांबले. हॉटेलमध्ये ते बसले असता तेथेच उभ्या असलेल्या सिंडिकेट आरामबसवरील वाहक कृषिकेश खिळे, चालक प्रसाद व अक्षय हेही तेथेच होते. यावेळी जुन्या भांडणाचा कारणावरून त्यांनी राजकुमार कोंढर यांना शिवीगाळ ,दमदाटी करीत हातातील लोखंडी रॉड व लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली.
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ही भांडणे सोडवली.यावेळी मारहाण करणारे आरामबस घेऊन पळून गेले. मारहाणीत राजकुमार कोंढर गंभीर जखमी झाले. त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला.त्यांना उपचारासाठी प्रथम नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून ससून रुग्णालय,पुणे येथे दाखल करण्यात आले होते.
रविवारी रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.