व्यवस्थापनाचा शाळा बंदचा निर्णय
प्रतिनिधी / उंब्रज :
उंब्रज ता.कराड येथील रूक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयातील इयत्ता १० वीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यानीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित विद्यार्थिनीच्या संपर्कातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची कोरोना तपासणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव शाळा व्यवस्थापणाने पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेतील तपासणी दरम्यान संबंधित विद्यार्थिनीचे शरीराचे तापमान जास्त असल्याने शाळा प्रशासनाने तिला तात्काळ कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार दि.२७ रोजी संबंधित विद्यार्थिनीसह वडील आणि बहीण यांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यावेळी या विद्यार्थिनीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
सुरक्षेच्या कारणास्तव शाळा व्यवस्थापनाने सोमवार पासून अनिश्चित काळासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्याध्यापिका जंगम यांनी सांगितले. दरम्यान अचानक शाळा बंद झाल्याने पालकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.