प्रतिनिधी / उंब्रज
उंब्रज ता. कराड येथील महामार्गालगत असणारे बॅटऱ्यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी नव्या व जुन्या अशा सुमारे २८ बॅटरी सुमारे ५० हजार रुपये किमंतीच्या लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने उंब्रज येथील व्यवसायिकांच्यात खळबळ उडाली असून रहदारीच्या ठिकाणी सेवा रस्त्यालगत असणारे दुकान फोडले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशियाई महामार्गालगत उंब्रज ता. कराड येथे एका पेट्रोल पंपाशेजारी सुपेरियल हे बॅटरी विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे सदरचे दुकान बंद करून दुकान मालक जाँय अण्णा मूळ राहणार केरळ सध्या राहणार उंब्रज ता. कराड हे रूमवर निघून गेले होते. त्यानंतर मंगळवार दि. २४ रोजी सकाळी त्यांना सदरचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे समजले. त्यानंतर जाँय अण्णा यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेवून चोरी झाल्याची माहिती दिली.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंद दुकानाचे कुलूप कटावणीने तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील एक्साइड, एसएसएफ, फ्रीडम या कंपनीच्या नवीन बॅटरी किंमत प्रत्येकी ४ हजार रुपये तसेच ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेल्या ६ बॅटरी व नादुरुस्त असलेल्या १५ बॅटरी अशा एकूण २८ बॅटरी लंपास केले आहेत. दरम्यान, सुपेरियर हे बॅटरीचे दुकान पेट्रोल पंपानजिक सेवा रस्त्यालगत आहे. येथून २४ तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र तरीही चोरट्यांनी हे दुकान फोडून तब्बल २८ बॅटरी चोरून नेण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.