रात्रीच्या अहवालात 237 बाधित, 546 जणांची कोरोनावर मात
सातारा, कराडात वेग मंदावला, खटाव, माणमध्ये थोडा वाढतोय
जिल्हय़ात 5 बाधितांचा मृत्यू
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात सध्या दीपावलीची धामधूम सुरु झालीय. त्यातच नोव्हेंबरच्या आरंभापासून कोरोना बाधितांची संख्येत कमालीची घट झाल्याचा दिलासा अनुभवत नागरिक बाजारपेठेत येवू लागले आहेत. मात्र, सध्या अल्पसंख्येने बाधित समोर येत आहेत. कोरोनामुक्तीचा वेग चांगला वाढल्याने आता उपचारार्थ रुग्णांची संख्या फक्त 2,684 एवढी राहिली आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्ण संख्या 966 जण असून 364 कोरोना केअर सेंटरमध्ये आहेत. तर 1,364 होम आयसोलेट असल्याची दिलासादायक परिस्थिती निर्माण झालीय.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी अहवालात 546 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात उपचार सुरु असलेल्या 5 बाधितांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 237 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
उपचारार्थ रुग्ण संख्या रोडावली
सप्टेंबरमध्ये जिल्हय़ात उपचारार्थ रुग्णसंख्या 10 ते 12 हजारांच्या घरात होती. सर्व जिल्हय़ात पॅनिक वातावरण निर्माण झाले होते. बेड, ऑक्सिजची कमतरता होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये हळूहळू संसर्गाचा वेग थंडावू लागला. नोव्हेंबरच्या आरंभी जिल्हय़ात उपचारार्थ रुग्णसंख्या 5 हजारांवर रेंगाळत होती. गेल्या दोन दिवसात कोरोनामुक्तीचा वेग वाढला, बाधितांचा कमी झाला तर उपचारार्थ रुग्ण संख्या खूप दिवसांनी 3 हजारांच्या खाली आहे. नागरिक काळजी घेत सर्व ठिकाणी वावरत असून हेच सवयभान जपत जिल्हा कोरोनामुक्तीकडे जावू शकतो.
सातारा, कराडसह सर्व तालुक्यांना दिलासा
सोमवारी रात्रीच्या अहवालात 157 जणांचा अहवाल बाधित आला. यामध्ये खटाव तालुक्यात 47 एवढी मोठी संख्या असून एकटय़ा सिध्देश्वर कुरोलीत 28 बाधित समोर आलेत. त्या खालोखाल माण 23, सातारा 20 व जावली 16 अशी बाधितांची संख्या असून कराडमध्ये फक्त 8 नवे बाधित समोर आलेत. हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा व कराडमध्ये मंदावलेला वेग दिलासादायक असून इतर तालुक्यातही नवीन बाधितांच्या संख्येत मोठी घट झालीय. तर सोमवारच्या अहवालात वाई तालुक्यात एक देखील नवीन बाधित समोर आला नाही.
भीती संपलीय पण काळजी आवश्यकच
कोरोनाची मोठी भीती सर्वांच्या मनात होती. अनेकांचे बळी भीतीनेच गेल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र, कोरोना बरा होतो हा विश्वास आता निर्माण झाला असल्याने भीती संपलीय. नोव्हेंबरचा आरंभ दिलासादायक ठरत असताना सर्वकाही सुरु झालेय. मात्र, अद्याप यावरील लस कधी येणार हे नक्की नाही. त्यामुळे दीपावलीच्या निमित्ताने खरेदीसाठी जाताना नागरिकांसह दुकानदारांनी योग्य ती खबरदारी घेतलीच पाहिजे. मास्क, सुरक्षित अंतर व स्वच्छता या तीन गोष्टी कटाक्षाने फालो कराव्याच लागणार आहेत.
जिल्हय़ात 5 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये कोपर्डे, ता. सातारा 80 वर्षीय पुरुष, जिह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव 55 वर्षीय पुरुष, राणंद, ता. माण 66 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले भुसे, ता. कोरेगाव 77 वर्षीय पुरुष, खिंडवाडी, ता. सातारा 83 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे.
348 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा 47, कराड 6, फलटण 6, कोरेगाव 54, वाई 25, खंडाळा 14, रायगांव 27, पानमळेवाडी 24, मायणी 18, महाबळेश्वर 10, पाटण 33, दहिवडी 24, म्हसवड 7, पिंपोडा 5 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 48 असे एकूण 348 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,94,464
एकूण बाधित 47,169
एकूण कोरोनामुक्त 42,680
मृत्यू 1,568
उपचारार्थ रुग्ण 2,921
मंगळवारी
एकूण बाधित 237
एकूण मुक्त 546
एकूण बळी 05