सातारा : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये सातारा जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या 876 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक विषयक सर्व बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी True Voter App विकसितत केले आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये या ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
त्याला अनुसरून, सातारा जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये केलेल्या दैनंदिन व एकूण खर्चाची तपशिलवार माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या या ॲपमध्ये भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी उमेदवारांनी Google प्ले स्टोअरमधून TrueVoter App डाऊनलोड करुन त्यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी तालुक्यातील संबंधित तहसिलदार यांचेशी संपर्क साधावा. निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी (बिनविरोध / विजयी / पराभूत) निवडणूकीचा निकाल प्रसिध्द झालेपासून 10 दिवसाच्या आत एकत्रित खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्रासह सादर करणे अनिवार्य आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसूल कीर्ती नलावडे यांनी दिली.