पद रिक्त असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय. टाळे ठोकण्याचा गणेश देशमुख यांचा इशारा
औंध / वार्ताहर
औंधच्या पशुवैद्यकीय प्रथम श्रेणीच्या दवाखान्यात गेल्या सहा महिन्यापासून वैद्यकीय अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांना संताप व्यक्त केला आहे. तातडीने वैद्यकीय अधिकारी पद न भरल्यास दवाखान्याला टाळे ठोकण्याचा इशारा गणेश देशमुख यांनी दिला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि औंधला पशुवैद्यकीय दवाखाना असून परीसरातील वडी, त्रिमली, लांडेवाडी, नांदोशी, खबालवाडी, औंध, येळीव, जायगांव, खरशिंगे, वरुड, भोसरे, अंभेरी आदी गावातील शेतकऱ्यांचा संबंध येतो. त्यामुळे गाई, म्हैशी,श्वान, बैल तपासणीसाठी शेतकरी दवाखान्यात येतात. मात्र गेल्या सहा महिन्यापासून दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. मे महिन्यात वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर येथे नव्याने डाँक्टर आलेले नाहीत. तात्पुरता अतिरिक्त कार्यभार इतर डाँक्टरांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दवाखान्यात असलेल्या दोन कर्मचाऱ्यावर सध्या कामकाज सुरू आहे. तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अडचणीच्या प्रसंगात डाँक्टर उपलब्ध होत नसल्याने लाख मोलाचे पशुधन डोळ्यासमोर हातातून जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभी राहिली आहे. सहा महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने सध्या तरी दवाखान्यात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शासनाने तातडीने वैद्यकीय अधिकारी पद भरावे अन्यथा नाईलाजाने दवाखान्याला टाळे ठोकावे लागतील. गणेश देशमुख, शेतकरी औंध